ससेमिरा चुकविला : पिंपळखुटीचे आरटीओ निरीक्षक कार्यालय यार्डात यवतमाळ : जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवर असलेल्या पिंपळखुटी चेक पोस्टवर मोठी अनागोंदी सुरू आहे. येथे चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी चक्क सीसीटीव्ही कॅमेराची दिशा बदलविण्यात आली आहे. वाहतूक निरीक्षकांचे कार्यालय थेट डिटेन यार्डातील खोलीत हलविले आहे. चेक पोस्टवर वाहतूक निरीक्षकांना वजन काटा सहज पाहता यावा आणि तेथील हालचालींवर २४ तास लक्ष ठेवता यावे यासाठी निरीक्षकांचे कार्यालय आहे. या ठिकाणी ३२ मेगा फिक्सलचे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहे. मात्र निरीक्षकांकडून या रुमचा वापर न करता वाहनांची गर्दी होत असल्याने काम करता येत नाही, अशी सबब सांगितली जाते. ही सबब सांगून डिटेन केलेली वाहने ज्या यार्डामध्ये लावण्यात येतात तेथील एका खोलीत निरीक्षकांनी कार्यालय थाटले आहे. यामुळे वजन काट्यावर काय सुरू हे दिसत नाही. शिवाय निरीक्षक कार्यालयातील कुठलाही प्रकार सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये येत नाही. सीसीटीव्हीची दिशा बदलविण्यासाठी कार्यालय हलविण्यात आले आहे. त्यामुळे येथे बिनबोभाटपणे अनेक गैरप्रकार केले जातात. १३ जून रोजी सकाळी ५.३० वाजता कर्तव्यावर असलेल्या वाहतूक निरीक्षकाने चक्क दोन ओव्हर लोड ट्रेलर काही हजार रुपये घेऊन सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तशी कबुली संबंधित ट्रेलरच्या चालकाने कॅमेरासमोर दिली होती. त्यानंतरही येथील परिस्थिती सुधारलेली नाही. नुकताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चेक पोस्टचा सर्च घेतला होता. मात्र हा केवळ कार्यालयीन सोपस्कार ठरला आहे. वाहतूक निरीक्षक नाकाडे यांचे बयान नोंदविण्यापलिकडे कुठलीही कारवाई झालेली नाही. उलट परिवहन विभागातील सज्जन अधिकाऱ्याकडून हे प्रकरण पद्धतशीरपणे कसे निस्तारता येईल याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आर्थिक देवाणघेवाणीवरही जोर दिला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनाही बेदखल वणी उपविभागातून होत असलेली ओव्हर लोड वाहतूक कोणत्याही परिस्थितीत बंद झाली पाहिजे, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर येथील बैठकीत परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यासाठी आऊट पोस्ट तयार करण्यास सांगितले होते. मात्र यावर अजूनही कोणतीच कारवाई झाली नाही. वणी ते करंजी दरम्यान आऊट पोस्ट दिल्यास ओव्हर लोड वाहतूक नियंत्रणात येऊ शकते असेही या बैठकीत सूचविण्यात आले होते. त्याअनुषंगाने कोणतीच उपाययोजना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून करण्यात आली नाही.
चेक पोस्टच्या कॅमेरांची बदलविली दिशा
By admin | Published: July 31, 2016 1:09 AM