राज्यस्तर फुटबॉल स्पर्धा : रविवारी रंगणार अंतिम सामना यवतमाळ : यजमान फे्रन्डस् क्लब यवतमाळ संघाने उपांत्य फेरीत बलाढ्य नागपूर सिटी पोलीस संघाचा शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात एकमात्र गोलने पराभव करून सत्तेचाळीस वर्षाच्या स्पर्धा आयोजनात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक देण्याची कामगिरी केली. रविवारी त्यांचा सामना चेतना क्लब पुसद संघाशी होणार आहे. फ्रेन्डस् फुटबॉल असोसिएशन यांच्यावतीने येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित राज्यस्तरीय फूटबॉल स्पर्धेत शनिवारी दुपारच्या सत्रात उपांत्य फेरीतील सामने घेण्यात आले. चेतना क्लब पुसद विरुद्ध डब्ल्यूएफसी वाघापूर संघादरम्यान झालेला पहिला उपांत्य सामना रंगतदार झाला. पुसद संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत सोहेल व आसिफ यांच्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर मध्यांतरापर्यंत २-० गोलची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर सोहेलने वैयक्तिक दुसरा गोल करून ३ गोलची अजेय आघाडी घेतली. वाघापूर संघाने ६५ व्या मिनिटात पेनॉल्टी मिळाली. पेनॉल्टीद्वारे एकमेव गोल केला. पुसद संघाने या सामन्यात ३ विरुद्ध १ गोलने विजय साजरा केला. फ्रेन्डस क्लब विरुद्ध नागपूर सिटी पोलीस संघादरम्यान रंगतदार सामना झाला. यजमान फ्रेन्डस् क्लबच्या खेळाडूंनी जबरदस्त खेळीचे प्रदर्शन केले. सचिन जयस्वाल, इमरान, सलमान, गौरव ठाकरे यांनी सांघिक खेळी करीत नागपूर संघाच्या खेळाडूंना झुंजविले. ४२ व्या मिनिटात फ्रेन्डस् संघाला कॉर्नर किक मिळाली. शेख नव्वाद या खेळाडूने सुरेख किक मारून चेंडू थेट गोल जाळ्यात भिरकाविला व संघाला १-० गोलची आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर नागपूर संघाने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र गोलरक्षक शफीकने त्यांचे सर्व प्रयत्न परतवून लावले. शेख नव्वादच्या विजयी गोलने यजमान फ्रेन्डस् क्लबने स्पर्धा आयोजनाच्या आपल्या ४७ वर्षाच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. यजमान संघाने स्वत:च आयोजित केलेल्या राज्यस्तर स्पर्धेत आजपर्यंत विजेतेपद पटकाविले नाही, हे विशेष. रविवार, १२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता फ्रेन्डस् क्लब विरुद्ध चेतना पुसद संघादरम्यान अंतिम सामना रंगणार आहे. अंतिम सामन्यानंतर लगेचच महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.प्रकाश नंदूरकर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषद उपाध्यक्ष सुभाष राय, प्रशांत बाजोरिया आदी उपस्थित राहतील. (क्रीडा प्रतिनिधी)
चेतना क्लब पुसद व फ्रेन्डस् क्लब यवतमाळ अंतिम फेरीत
By admin | Published: February 12, 2017 12:23 AM