मणिंदरजितसिंह बिट्टा : केवळ भारत माता की जय म्हणणे म्हणजे देशभक्ती नव्हे यवतमाळ : भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. सैन्यबल व संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राच्या संस्कृतीने भक्कम योगदान दिले आहे. या भूमित छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा महान राजा जन्माला आला. त्यांनी पेरलेले छत्रतेजाचे बिज आजही येथील संस्कृतीकडून जोपासले जात आहे. यामुळेच भारत सर्वच बाजूंनी सुरक्षित आहे. यापुढेही देशाला भक्कम बनविण्यासाठी महाराष्ट्रातील त्या संस्कृतीचा वसा अनंत काळ टिकविण्याचे आवाहन जिंदा शहीद मनींदरजीतसिंह बिट्टा यांनी केले. मनिंदरजीतसिंह बिट्टा यवतमाळात आले असताना ते ‘लोकमत’शी चर्चा करीत होते. आजच्या राष्ट्रभक्ती व राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर त्यांनी सडकून टीका केली. वंदे मात्रम म्हणणे, तिरंगा ध्वज लावणे, फडकविणे, भारत माता की जय म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रभक्तीचा राजकारण्यांकडून चुकीचा वापर केला जात आहे. एकप्रकारे सामान्य भारतीयांना या माध्यमातून भ्रमित करून सत्ता स्थापनेसाठी वापरले जात आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनातून केवळ राष्ट्रभक्तीच्या नावावर सत्ताच स्थापन केली, हे अतिशय चूक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राला योग्य उत्तर देण्यात आले. सर्जिकल स्ट्राईकमध्ये शत्रू राष्ट्राच्या घरात घुसून सैनिकांनी ४५ जवानांना ठार केले. या भूमिकेचे समर्थन करण्याऐवजी उलट प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारून एक प्रकारे आतंकवादाचे समर्थन करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र हे सर्वोच्चस्थानी आहे. राष्ट्रामुळे शरीर बनले आहे. या राष्ट्रासाठी एक दिवस नाही, तर एक महिनाही उपाशी राहण्याची तयारी असायला हवी, असेही त्यांनी सांगितले. सैन्यदलातील अंतर्गत बाबी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर काढणे चुकीचे आहे. अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून शत्रू राष्ट्रांच्या हाती लागले, तर त्याचा देशाला धोका निर्माण होऊ शकतो. शत्रू राष्ट्र त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे सैनिकांनीही तक्रारी करण्याच्या सनदशीर आयुधाचा वापर करावा. कदापि राष्ट्रहिताच्या आड येईल अशी गोष्ट करू नये, असे मनिंदरजीतसिंह बिट्टा यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
छत्रपतींच्या छात्रतेजानेच भारत सुरक्षित
By admin | Published: March 16, 2017 12:59 AM