मुलाखती : सोईनुसार ‘वाकणाऱ्या’ उमेदवाराचा शोधयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या मर्जीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या शोधात आहेत. बँकेचे विद्यमान सीईओ अॅड. पुरुषोत्तम काकडे यांना तीन महिने मुदतवाढ दिली गेली होती. ही मुदत जुलै अखेर संपणार आहे. त्यामुळे बँकेने नव्या सीईओसाठी अर्ज मागितले आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वी मुलाखतीही झाल्या. मात्र नागरी बँकांचा अनुभव असलेलेच उमेदवार आले. त्यातून बँकेला हवे तसे सक्षम उमेदवार मिळाले नसल्याचे सांगितले जाते. सीईओ पदाच्या पात्रतेसोबतच त्याची ‘फ्लेक्सीबिलीटी’ तपासली जात आहे. सीईओ पदाचा उमेदवार संचालकांच्या आदेशावर किती ‘वाकणारा’ आहे, हे महत्वाचे ठरते. कदाचित हीच खरी पात्रताही बँकेत पाहिली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा बॅकेच्या सरव्यवस्थापकांचे नावसुद्धा सीईओ पदाच्या शर्यतीत आहे. बँकेचा आर्थिक कारभार सुधारण्यासाठी व नियमानुसार बँक चालविण्यासाठी अनेक संचालक त्यांच्या बाजूने आहेत. मात्र काही ज्येष्ठ संचालकांचा त्यांना विरोध आहे. कारण ताठर भूमिकेचे सरव्यवस्थापक सीईओ झाल्यास आपल्या कारभाराचे काय याची चिंता या काही संचालकांना भेडसावत असल्याची चर्चा बँकेच्या वर्तुळातून ऐकायला मिळते. वैयक्तिकरीत्या दोन डझनावर संचालक सरव्यवस्थापकांसाठी पॉझिटीव्ह असले तरी एकत्र बैठकीत मात्र ज्येष्ठांकडून मतपरिवर्तन करून त्यांना ‘निगेटिव्ह’ बनविले जात असल्याचे बँकेचे हित जोपासणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. लाखो शेतकऱ्यांचा आर्थिक आधार आणि हजारांवर कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेली ही बँक बंद पडू नये, त्यासाठी कठोर निर्णय घेणारे प्रशासन, व्यवस्थापन आणि संचालकसुद्धा यावे, अशी या सामान्य कर्मचाऱ्यांची रास्त भावना आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा बँकेला हवा मर्जीतील सीईओ
By admin | Published: July 19, 2014 1:49 AM