तळपत्या उन्हात दौरा : बंदद्वार आढाव्यासाठी जिल्ह्याची यंत्रणा बाभूळगावात, बसायलाही नव्हती जागा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतकऱ्यांपुढे तूर विकण्याची सर्वात मोठी समस्या उभी ठाकली आहे. ज्यांनी तुरी विकल्या, त्यांना मोबदला मिळालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाभूळगाव दौऱ्यात याबाबत दिलासादायक घोषणा करतील, अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र तुरीच्या मुद्द्यावर चपखलपणे हातावर तुरी देऊन काढता पाय घेतला. केवळ तळपत्या उन्हात रोहयोतील सिंचन विहीर, खोदलेले शेततळे आणि सौरपंप अशा एकमेव लाभार्थ्याच्या कामाची त्यांनी पाहणी करून दौरा संपविला. आढावा बैठकीसाठी संपूर्ण जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा बाभूळगाव पंचायत समितीच्या सभागृहात एकवटली. तिथे धड बसायलाही जागा नसल्याने अर्धेअधिक अधिकारी बाहेरच होते. राज्याचा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने थेट गावात उतरून रणरणत्या उन्हात शेतात येतो. त्यामुळे परिसरातीलच नव्हेतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. तुरीच्या खरेदी-विक्रीत होत असलेल्या होरपळीवर मुख्यमंत्री फुंकर घालणार याची मनिषा अनेकांच्या मनात निर्माण झाली. मुख्यमंत्री बेधडक बाभूळगाव तालुक्यातील सरूळ येथील युवा शेतकरी आनंद श्रीहरी सोळंके यांच्या शेतात पोहोचले. सोबत पालकमंत्री मदन येरावार, सचिव, जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी, आमदार असा ताफा भर दुपारी २.३० वाजता पोहोचला. या उन्हातही मुख्यमंत्र्यापुढे आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी काही शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ तेथे आले होते. मात्र, वरिष्ठांच्या आदेशावरून पोलिसांनी त्यांना तत्काळ पांगविले. मुख्यमंत्र्यांनी केवळ औपचारिकता म्हणून येथील रोहयोतील सिंचन विहीर, कृषी विभागाने रात्रीतून खोदलेला तलाव आणि सौरपंपाची पाहणी केली. मोटरपंपाचे बटन दाबून पंप सुरू केला. त्यानंतर त्यांनी ना कुणाशी चर्चा केली, ना कुणाला बोलण्याची संधी दिली. थेट गाडीत बसून मुख्यमंत्र्यांचा ताफा आढावा बैठकीच्या स्थळी पंचायत समिती कार्यालयात पोहोचला. तोपर्यंत त्यांच्या मागोमाग प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमाही पोहोचला. नंतर बैठकीला सुरूवात झाली. बैठकीत बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने अनेकांना बाहेरच थांबावे लागले. एकाच वेळी विविध विषयांची केवळ तोंडओळख करण्याचा सोपस्कार झाला. ठेवणीतील निर्देश देऊन मुख्यमंत्री आल्या पावली परत गेले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी तूर खरेदी आणि त्याचा मोबदला हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला असता सोईस्करपणे बगल दिली. मागच्या सरकारपेक्षा आम्ही कसे सरस, याचीच आकडेमोड करून मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या, अशी प्रतिक्रिया जनमानसातून ऐकायला मिळाली. शेतकरी संघर्ष समितीला भेट नाकारली जिल्ह्यातील तूर खरेदीच्या मागण्यांसंदर्भात शेतकरी संघर्ष समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तूर खरेदीच्या निर्णयाबाबत अभिनंदनाचा उल्लेख असलेले पत्र घेऊन त्यात काही सुधारणा कराव्या, याचे निवेदन देण्यासाठी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, अरुण राऊत, अरविंद वाढोणकर, वसंत घुईखेडकर, अनिल गायकवाड, रमेश मोते, अमर शिरसाट, संजय कापसे, अनिल परडखे आदी पंचायत समिती परिसरात पोहोचले. मात्र त्यांना पोलिसांनी बाहेरच पकडून मुख्यमंत्र्यांकडे जाण्यास मज्जाव केला. यापूर्वी लोकजागृती मंचाचे देवानंद पवार यांना यवतमाळातील निवास्थावरूनच ताब्यात घेतले. तसेच स्वामिनी दारूबंदी अभियानाच्या मनिषा काटे यांनाही पोलिसांनी स्थानबद्ध केले. धुळीचा त्रास टाळण्यासाठी ओतले पाणी पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री दौऱ्यावर आले. त्याच दौऱ्यात पाण्याची नासाडी झाली. मुख्यमंत्र्यांना येथील धुळीचा त्रास होऊ नये म्हणून सरूळमध्ये बांधकाम विभागाच्या चार टँकरने अक्षरश: भर दुपारी रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहिले. यासाठी पाण्याची नासाडी करण्यात आली. सरूळ ग्रामस्थ मोठ्या आशेने ग्रामपंचायत कार्यालयात एकवटले होते. या गावातील ग्रामसंरक्षण दलाचे उल्लेखनीय कामकाज, स्वच्छतेची जाणीव असलेले नागरिक, त्यातून बदललेले गाव मुख्यमंत्र्यांनी पाहावे, अशी उत्सुकता होती. मात्र त्यांनी वाहनातूनच ‘जय गुरूदेव’ म्हणत गावकऱ्यांचा निरोप घेतला. केवळ एका गुरुदेव भक्ताकडून देण्यात आलेली पुस्तकाची भेट त्यांनी स्वीकारली.
तुरीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची चुप्पी
By admin | Published: May 07, 2017 12:55 AM