लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पोलिसांनी रात्रंदिवस परिश्रम करून गर्भवती वाघिणीच्या मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वॉच होता, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मुकुटबन परिक्षेत्रात २५ एप्रिल रोजी दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या वाघिणीला गुहेत डांबून तिची अतिशय निर्दयीपणे शिकारीच्या हेतून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने मुख्यमंत्री व्यथित झाले. घटनेची माहिती मिळताच, त्यांनी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना या प्रकरणात लक्ष घालून तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या, अशी माहितीही भुमरे यांनी दिली. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी यांनी यावेळी व्यक्त केला. गर्भवती वाघिणीच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने व त्यांच्या पथकाची कामगिरी मोलाची ठरली. पोलिसांनी पाटण परिसरात खबरे पेरून ठेवले होते. आरोपी अशोक लेतू आत्राम व लेतू रामा आत्राम यांनी वाघिणीचे नख विकण्याचा प्रयत्न चालविला असल्याची माहिती मिळताच सापळा रचून शुक्रवारी दुपारी आरोपींना अटक करण्यात आली.
५० हजारांचे बक्षीस या प्रकरणाच्या तपासासाठी वनविभाग व पोलिसांच्या वेगवेगळ्या चमू तयार करण्यात आल्या होत्या. ज्या चमूने तपासात बाजी मारली, त्यांना ५० हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.