यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळातील शासकीय दौरा प्रस्तावित आहे. शेतकरी आत्महत्येवर मंथन करण्यासाठी विशेष कार्यशाळा ३ मार्च रोजी आयोजित केली जाणार आहे. या कार्यशाळेनंतर मुख्यमंत्र्यांनी एखाद्या गावातील शेतकरी कुटुंबात मुक्काम करून त्यांच्याशी हितगुज करण्याचे प्रस्तावित केले आहे. याबाबत अधिकृत दौरा आलेला नसला तरी पक्षस्तरावर मात्र मुक्काम आपल्याच मतदारसंघात व्हावा यावरून खल सुरू आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर विदर्भाला देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मुख्यमंत्रीपद लाभले आहे. त्यांची नाळच येथे जुळलेली असल्याने मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्येची सल गांभीर्याने घेतली आहे. शेतकरी आत्महत्यांवर एक स्वतंत्र कार्यशाळा यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रस्तावित आहे. त्या दृष्टीकोणातून जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. याबाबतचा अधिकृत कार्यक्रम आलेला नाही. मात्र वरिष्ठांकडून घेतल्या जात असलेल्या पाठपुराव्यावरून मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित मानला जात आहे. यावरच न थांबता मुख्यमंत्र्यांनी खुद्द शेतकरी कुटुंबासोबत रात्र घालविण्याची मनीषा व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांसोबत रात्रभर गावात राहून त्यांच्याशी थेट हितगुज करण्याची तयारी आहे. याच ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या मोठ्या योजनेचीही घोषणा केली जाणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी नेमका मुक्काम कुठे करावा यावरून स्थानिक पातळीवर डावपेच आखले जात आहे.भाजपाचे पाच आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडून ही खेळी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघातील गावात मुक्कामी यावे, यावर चढाओढ सुरू आहे. त्यातच शनिवारपासून अचानक वातावरण बदलले असून गारा आणि वादळी पाऊस जिल्हाभर सुरू आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री जिल्ह्यात मुक्कामी येतील काय असाही प्रश्न काहींकडून उपस्थित केला जात आहे. या सर्व शक्यता नाकारुन पक्षस्तरावर मात्र मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामाचे कसे भांडवल करता येईल, यासाठी स्थानिक पुढाऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ मुक्कामावरून खल
By admin | Published: March 02, 2015 2:03 AM