ऑनलाईन लोकमतवणी : घरात गुप्तधन असल्याचा दावा करून ते काढण्यासाठी एका विवाहितेचा अनन्वित छळ करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी मांत्रिकासह, विवाहितेचा पती, सासू व सासऱ्यासह पाचजणांविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यात प्रतिबंधक अधिनियम सन २०१३ कलम तीन जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्ह्याचाही समावेश आहे.भालर येथील प्रकाश राजूरकर यांच्या भावना नामक मुलीचा विवाह मारेगाव तालुक्यातील टाकळी येथील गजानन डाहुले याच्याशी ४ एप्रिल २०१७ रोजी पारंपरिक पद्धतीने झाला होता. यावेळी राजूरकर कुटुंबाने लग्नाच्या खर्चापोटी डाहुले कुटुंबाला दोन लाख रुपये दिले होते. त्यानंतरही डाहुले कुटुंबाच्या मागणीनुसार भावनाचे वडिल प्रकाश राजूरकर यांनी वेळोवेळी पैैसे दिले. मात्र यामुळे डाहुले कुटुंबाचे समाधान झाले नाही. लग्नाला अवघे काही महिनेच झाले असताना सन २०१७ च्या आॅक्टोबर महिन्यात एका नव्याच प्रकाराला भावनाला सामोरे जावे लागले. आपल्या घरात गुप्तधन आहे. तू पायाळू आहेस, त्यामुळे गुप्तधन काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या पूजेला तू बस, असा हट्ट भावनाचा पती गजाननने धरला. त्यातून तिला अनेकदा मारहाणही करण्यात आली. गुप्तधन काढण्यासाठी राळेगाव तालुक्यातील येवती येथून नानाजी कुबडे नामक मांत्रिकाला पाचारण करण्यात आले. ठराविक दिवशी हा मांत्रिक घरातच पूजा मांडायचा. भावनाला पूजेवर बसवून तिच्या हातावर काजळी लावली जायची. त्यानंतर तिचा वेगवेगळ्या पद्धतीने छळ केला जायचा, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर भावना आपल्या माहेरी निघून आली. यासंदर्भात शनिवारी भावनाने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिक नानाजी कुबडे, पती गजानन डाहुले, सासरा अशोक धर्माजी डाहुले, सासू सविता अशोक डाहुले, दिर राजू अशोक डाहुले यांच्याविरुद्ध भादंवि ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झाली नव्हती.कारवाईसाठी पोलिसांकडून विलंबहोत असलेल्या अत्याचाराबाबत भावनाच्या कुटुंबांनी अनेकदा मारेगाव पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजविले. मात्र सुरूवातील तक्रारच घेण्यात आली नाही. एकदा घेतली. मात्र अनेक दिवस त्यावरही कारवाई करण्यात आली नाही. अखेर शनिवारी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले.
गुप्तधनासाठी पायाळू सुनेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:24 PM
घरात गुप्तधन असल्याचा दावा करून ते काढण्यासाठी एका विवाहितेचा अनन्वित छळ करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे.
ठळक मुद्देटाकळीतील घटना : मांत्रिकासह सासरच्या पाच जणांविरूद्ध गुन्हा