लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाकाळात बालसंरक्षण समितीवर गावाची धुरा सोपविण्यात आली. जबाबदारी निश्चित झाल्याने दोन वर्षांत ४५ बालविवाह पुढे आले. या प्रकाराने महिला बालकल्याण विभागही हादरला आहे. बालविवाहाला विविध बाबी कारणीभूत आहेत.
कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती ढासळली. याच काळात कमी खर्चात लग्नसोहळे पार पडत होते. गावपातळीवर बालविवाह पार पाडण्यासाठी अल्पवयीन प्रेमप्रकरण हे नवे कारणही पुढे आले आहे; तर काही ठिकाणी निरक्षरता आणि आर्थिक विवंचना यांतून पालकांनी आपल्या मुलींचे लग्न उरकून टाकले. कुटुंबातील आर्थिक ओझे कमी होईल, या कारणांनीही विवाह सोहळे पार पडले आहेत. या प्रकाराला महिला बालकल्याण विभागाने ब्रेक लावला आहे.
पटसंख्या कमी झालेली मुली गेल्या कुठे?
नुकत्याच उघडलेल्या शाळांमध्ये एक लाख १० हजार ४७९ विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ६१० विद्यार्थ्यांची हजेरी लागली. यामध्ये गैरहजर मुलींची संख्या फार जास्त आहे. पटसंख्या कमी झालेल्या मुली कुठे गेल्या याचा प्रश्न शाळांना पडला आहे.
दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र
अल्पवयीन मुलींचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. यानंतरही काही पालकांनी आपल्या मुलींचा विवाह पार पाडला.
यामुळे खंडाळा आणि पंगडी गावामध्ये असा विवाह पार पाडणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले गेले.
आर्थिक विवंचना हेच कारण
बालविवाह पार पडण्याच्या मागे विविध बाबींचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक विवंचना पुढे आली आहे.
अल्पवयीन मुलींचे प्रेमप्रकरणही पुढे आले आहे. आपली मुलगी पळून जाण्यापेक्षा तिचे लग्न करणे योग्य ठरविले.
काही विशिष्ट समाजात अल्पवयीन मुलीचे लग्नसोहळे पार पडतात. आर्थिक विवंचना आणि निरक्षरता बालविवाह करण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. स्थलांतरित कुटुंबामध्ये अशा प्रकारचे विवाह सोहळे दिसून येतात.
- सुनील भेले, सामाजिक कार्यकर्ता
गत दोन वर्षांमध्ये ४५ बालविवाह पुढे आले आहे. या प्रकाराला महिला बालकल्याण विभागाने आळा घातला आहे. यापूर्वी असे प्रकार फारसे घडले नाहीत. गावपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन केल्या जात आहेत.
- देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी