फोटो
ढाणकी : महाराष्ट्रातून कुपोषण हद्दपार व्हावे आणि कोणतेही बालक सकस आहारापासून वंचित राहू नये, म्हणून शासन प्रत्येक बालकाला अंगणवाडी केंद्रामार्फत सकस आहार पुरवीत आहे. मात्र, हा आहार सकस कमी आणि निकस ठरत असल्याची ओरड सध्या पालक वर्गातून होताना दिसत आहे.
ढाणकी शहरात सध्या ११ अंगणवाडी केंद्रे आहेत. या केंद्रातून ० ते ३ आणि ३ ते ५ वयोगटांतील बालकांना पोषण आहार पुरविला जातो. या आहारात मूग, मसूर, साखर, चणा, तांदूळ, हळद, चटणी, मीठ, गहू आदींचा समावेश आहे. हे साहित्य अंगणवाडीमार्फत वितरित केले जाते. मात्र, शहरात काही अंगणवाड्यांमार्फत हळद, चटणी, मसूर डाळ निष्कृष्ट असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
हळद आणि चटणी ही नुसती भुकटी असून, त्यात जीवघेणे रंग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात बालकांना जीवघेणा आजारही होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या सुरू महिन्यात वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात हळद आणि डाळ ही अतिशय निष्कृट असून, डाळीमध्ये जाळ्या झालेल्या आढळून आल्या. हळद नुसती नावालाच आहे. चण्यामध्ये भुंगा किडे आढळून आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे यावरून स्पष्ट होत असून, आता यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
कोट
बालकांना हलक्या दर्जाचा माल मिळणे हे अत्यंत गंभीर आहे. शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असा माल वितरित करून शासनाने गरिबांची थट्टा मांडली. याबाबत तक्रार करणार आहे.
ज्योती ओमराव चंद्रे, सभापती, महिला व बालकल्याण नगरपंचायत, ढाणकी.
कोट
निकृष्ट दर्जाचा आहार बालकांना पुरवून शासन, प्रशासन गरिबांची थट्टा करीत आहे. या आहारामुळे पुढील पिढी सुदृढ कशी होईल, हा मोठा प्रश्न आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.
सय्यद माजीद, तालुका अध्यक्ष, प्रहार, उमरखेड.