घाटंजी न्यायालयाचा निकाल : ११ वर्षांपूर्वीचे प्रकरण घाटंजी : चिंकारा हरिण शिकार प्रकरणात एका आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम.एम. वर्मा यांनी ठोठावली. तर इतर चार आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. पारवा पोलीस ठाण्यांतर्गत केळझरा येथे ११ वर्षापूर्वी शिकारीचे प्रकरण उघडकीस आले होते. इसाभाई इक्बाल मालाणी रा. केळझरा, ता. आर्णी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ११ वर्षापूर्वी म्हणजे ४ जून २००६ रोजी केळझरा बीटमध्ये चिंकाराची शिकार करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी धाड टाकली तेव्हा केळझरा येथील इसाभाई इक्बाल मालाणी यांच्या घरातून चिंकारा हरणाचे शिर, एक किलो मांस, दोन किलो शिजलेले मांस जप्त करण्यात आले. तसेच या घरातून एक विदेशी बनावटीची बंदूकही जप्त करण्यात आली होती. इसाभाईसह आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील एक आरोपी मुजाहिद्दीन उफ सैय्यद शरीफ रा. हैद्राबाद याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. तर सैय्यद अमीर हुसेन व बाबाभाई रा. हैदराबाद फरार आहेत. त्यामुळे पाच जणांविरुद्ध न्यायालयात खटला चालविला. त्यातील इसाभाई यांना तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. तर अराफत रा. हैदराबाद, इक्बाल मालाणी रा. केळझरा, निसार सर्वे, शेख मौला शेख इमाम दोघेही रा. सावळी सदोबा यांची निर्दोष सुटका करण्यात आली. या प्रकरणात न्यायालयाने २१ साक्षी तपासल्या. सरकारी पक्षातर्फे अॅड़ ए.ए. तलवारे यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)
चिंकारा हरीणाच्या शिकाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By admin | Published: April 19, 2017 1:08 AM