शासनाची उदासीनता : पर्यावरण विभागाच्या जाचक अटीमुळे अवकळा वणी : तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर (कॉलरी) येथील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर गंडांतर ओढवले आहे. पर्यावरण विभागाच्या जाचक निकषांमुळे या उद्योगावर अवकळा आली आहे. परिणामी चुना भट्टी व गिट्टी खाणीत काम करणाऱ्यांवर संकट ओढवले आहे. तालुक्यात राजूरची (कॉलरी) ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळख आहे. या गावात ब्रिटीशांच्या काळातच चुना उद्योगाने बाळसे धरले होते. या चुना उद्योगात काम करणारे कामगार देशाच्या कानाकोपऱ्यातून राजूर येथे दाखल झाले आहे. त्यापैकी अनेक कामगार तेथेच कायमस्वरूपी स्थायीक झाले आहेत. तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राजूर हे गाव आहे़ या गावात देशाच्या अनेक प्रांतातील नागरिक वास्तव्य करतात. त्यात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम आदी राज्यातील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळेच या गावाला आता ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. राजूर येथे ब्रिटीश काळापासून चुना तयार करणाऱ्या जवळपास ३० ते ४० चुना भट्ट्या होत्या. चुना तयार करण्यासाठी लागणाऱ्या डोलोमाईट व लाईम स्टोन, या कच्या मालाचे उत्पादन करणाऱ्या जवळपास १५ खाणीही तेथे होत्या.त्यापैकी आता केवळ चुना तयार करणारे सात ते आठ चुना भट्टे व दोन ते तीन गिट्टीच्या खाणीच तेवढ्या सुरू आहे. उर्वरित सर्व चुना भट्ट्या आणि डोलोमाईटच्या खाणी ठप्प पडल्या आहेत. चुन्यासाटी लागणारा कच्चा माल डोलोमाईट, लाईम स्टोनच्या खाणींवर पर्यावरण विभागाने अनेक नियम लादले आहे. त्यात जाचक अटी आहेत. लघु उद्योग असलेल्या डोलोमाईट आणि लाईम स्टोन खाणींना आता मोठ्या उद्योगांच्या अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहे. त्या अटी, शर्तीची पूर्तता करणे कठीण झालयाने चुना तयार करणारे लघु उद्योजक संकटात सापडले आहे. पर्यावरण विभागाच्या जाचक अटी व शर्तींमुळे चुना उद्योगाला कच्चा माल पुरविणाऱ्या लाईम स्टोन व डोलोमाईटच्या जवळपास १० ते १२ खाणी सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या खाणींमध्ये काम करणारे सर्वच कामगार बेरोजगार झाले. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. सोबतच शासनाच्या गौण खनिज कराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी) मजूर सापडले संकटात चुना तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध नसल्याने लघु उद्योजकांवर चुना भट्टे बंद करण्याची वेळ ओढवली. परिणामी डोलोमाईट व चुना भट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांनाही आता काम मिळेनासे झाले आहे. ते बेरोजगार होत आहेत. त्यांचे कुटुंबच संकटात सापडले आहे. रोजगार नसल्याने संसाराचा गाडा हाकणे त्यांना कठीण झाले आहे.
वणीतील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर गंडांतर
By admin | Published: July 23, 2016 12:26 AM