महागाव : वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोष भडकला आहे. मंगळवारी अंबोडा येथील शेकडो नागरिकांनी तहसीलवर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले.
माजी पंचायत समिती सदस्य संदीप ठाकरे, शैलेश कोपरकर, हनवंतराव देशमुख, प्रवीण ठाकरे, स्वप्निल अडकिने यांच्या नेतृत्वात अंबोडा, करंजखेड, आमनी, जनुना, कलगाव आदी गावांतील नागरिकांनी तहसीलदार विश्वंभर राणे यांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारासंदर्भात निवेदन सादर केले.
तालुक्यासह शहरातील वीज गायब होत असल्याने नागरिक प्रचंड त्रासले आहे. ग्राहकांना नियमित वीज मिळावी म्हणून नागरिकांनी एल्गार पुकारला आहे.
संबंधित उपकार्यकारी अभियंता कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत नाहीत, विचारणा केल्यास ग्राहकांना उलट विचारणा केली जाते, आदी आरोप निवेदनातून करण्यात आला. हे सर्व प्रकार बंद करून अभियंत्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांनी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही समस्या उजागर केल्याबद्दल आभार मानले.
बॉक्स
अंबोडा फिडर ठरले कुचकामी
अंबोडा फिडरवरील करंजखेड, आमनी, जनुना, कलगाव येथील वीजग्राहकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वीज वितरणकडून सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास उपकार्यकारी अभियंत्यांची येथून हकालपट्टी करावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे.