यवतमाळ : येथील सीतानगरीमध्ये घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना मंगळवारी रात्री नागरिकांनीच रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले. शहरात घरफोड्या करणारे बहुतांश चोरटे कारागृहात असल्याने घरफोडीच्या घटना थांबल्या होत्या. मात्र ३१ डिसेंबरला काही कुख्यात चोरटे जामिनावर बाहेर आल्याने त्यांनी घरफोडीचा सपाटा लावला होता. शेख नोबीन शेख इसराईल (२९) रा. चमेडियानगर, धीरज अरुण वासनिक (१८) रा. पाटीपुरा, रवी मेश्राम (२२) रा. शिंदेनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सीतानगरी परिसरातील प्रमोद भंडारी यांच्या घरात मंगळवारी रात्री १ वाजताच्या सुमारास शिरण्याचा प्रयत्न तिघे जण करीत होते. हा प्रकार तेथील एका नागरिकाच्या लक्षात आला. त्याने मोबाईलद्वारे परिसरातील नागरिकांनी सूचना दिली. त्यावरून नागरिकांनी तिघांना शिताफीने पडले. चोरटे पकडल्याची माहिती वडगाव रोड पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अलका गायकवाड, शिपाई बंडू मेश्राम, विवेक नगराळे यांनी घटनास्थळ गाठून आरोपींना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हे चोरटे ३१ डिसेंबरलाच जामिनावर बाहेर आले होते. त्यांच्या शिरावर अनेक घरफोड्या आहेत.
अट्टल घरफोड्यांना नागरिकांनी पकडले
By admin | Published: January 07, 2016 3:12 AM