लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेत मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकविकास समन्वय संघर्ष समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या (सीटू) वतीने येथील नाग चौकातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या वसाहतीमध्ये चांगले रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या, पथदिवे, मुलांना खेळण्यासाठी मैदानही नाही. या परिसरातील घरांना नगरपरिषदेच्या वतीने क्रमांकही देण्यात आले नाही. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
या वसाहतीत खेळाचे मैदान, उद्यान, अभ्यासिका, अंगणवाडी, बालवाडी, शाळा आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, समाज मंदिर बांधून द्यावे, नळाच्या पाइप लाइन वाढवून देण्यात याव्या, सार्वजनिक शौचालय, घरकुल बांधून द्यावे आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
या मागण्यांसाठी सामूहिक बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, मुख्याधिकारी महेश जामनोर, एन. डी. चव्हाण यांनी आश्वासन दिल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला होता. परंतु, आश्वासनाची पूर्तता झाली नाही. मोर्चाला विजय गाभने, उज्ज्वला पडलवार यांनी संबोधित केले. भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान केवटे यांनी पाठिंबा दिला.
यावेळी गंगाधर गायकवाड, नारायण साबळे, ज्योती जोगदंड, रत्नमाला गायकवाड, पंडित जोगदंड, संतोष पवार, उज्ज्वला जोगदंड, रवी काळे, शारदा साबळे, नंदा कांबळे आदींची भाषणे झाली. मोर्चात करवंदा गायकवाड, लता गायकवाड, श्याम सरोदे, जयराज गायकवाड, बबन वाहुळकर, चांदू लोखंडे, साहेबराव गजभारे आदींचा सहभाग होता.