या कार्यालयात फेरफार, नकाशा व इतर महत्त्वाची कागदपत्रे काढावी लागतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १०० ते १५० रुपये खर्च करावा लागतो. मात्र, तरीही १५ ते २० दिवस चकरा मारूनही कागदपत्रे मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तालुक्यात ५४ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायतींमधील शेतकरी व शेतमजुरांना भूमी अभिलेख कार्यालयातील फेरफार, नकाशा तसेच इतर शेती अथवा घरांची कागदपत्रे घेण्यासाठी यावे लागते.
शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन नकलाचे अर्ज सादर करतात; मात्र, अधिकारी नागरिकांना उद्धट भाषेत बोलून प्रथम अर्ज ऑनलाईन करा, नंतर तुम्हाला फेरफार व नकाशा मिळेल, असे सांगतात. नंतर अर्ज ऑनलाईन केल्यानंतरही १५ ते २० दिवस कागदपत्रे मिळत नाहीत. दिवस व पैसे खर्च करून, मजुरी पाडून चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांत भूमिअभिलेख कार्यालयाबद्दल प्रचंड संताप आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.