नेर : नेर तालुक्यातील वटफळी येथील पाण्याची मोटार जळाल्याने गेल्या २० दिवसांपासून येथील सार्वजनिक नळाला पाणीच येणे बंद झाले. त्यामुळे भरपावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील एका विहिरीतून सध्या नागरिक पाणी भरत असले तरीसुद्धा या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.नेर तालुक्यातील वटफळी येथे झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक नळाची मोटार जळाल्यामुळे २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. ही मोटार दुरुस्तीचा खर्च पाच हजार रुपये आहे. सदर मोटार दुरुस्तीसाठी बोदेगाव येथे नेण्यात आली आहे. परंतु येथील दुरुस्ती केंद्राचा करार संपल्याने मोटार तिथेच पडून आहे. या सर्व बाबींचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. सध्या नागरिक पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका विहिरीतून पाणी आणतात. परंतु या विहिरीतील पाणी दूषित आहे. ग्रामपंचायतकडे ब्लिचिंग पावडर उपलब्ध असतानासुद्धा ते या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यास टाळाटाळ करीत आहे. याबाबत काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी गावातील विहिरीचे दूषित पाणी चक्क गटविकास अधिकाऱ्यांकडे नेले होते. गावातील नळ योजना पूर्ववत करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. या गावातील झोपडपट्टीवासियांना ग्रामसेवकाने घरकुलांचे आमिष देऊन करवसुली केली. नंतर मात्र ही झोपडपट्टी बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला.येथील सध्या कर्तव्यावर असलेल्या महिला ग्रामसेवक बाहेरगावहून ये-जा करीत असल्याने गावातील विकास कामांचा बोजवारा उडाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्यातच नागरिकांच्या जीव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला अपयश येत आहे. नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा आणि दिलासा द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वटफळीच्या नागरिकांना २० दिवसांपासून पाणीच नाही
By admin | Published: August 09, 2014 11:57 PM