लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असलेल्या पवारपुरा, इंदिरानगर परिसराला पूर्णत: सील केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडूच नये असे आदेश आहे. मात्र घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. हा मुद्दा घेवून मंगळवारी दुपारी इंदिरानगरातील नागरिक रस्त्यावर उतरले होते.महसूल, नगरपरिषद, आरोग्य विभाग व अन्य प्रशासनातील अधिकारी या भागात फिरकत नाहीत, शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही, केवळ दानदाते व सामाजिक संस्थांच्या मदतीवरच वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्वत्र जेवण-धान्य पोहोचत नाही, पर्यायाने आमची उपासमार होत आहे, असा सरसकट सूर या जमावाने व्यक्त केला. एरिया सील असल्याने घराबाहेर निघू दिले जात नाही, घरातील अन्न धान्य संपले आहे, शासनाकडून पुरवठा होत नाही, त्यामुळे आम्ही जगावे कसे असा मुद्दा या जमावाने उपस्थित केला. शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी दिला जातो, या निधीतून इंदिरानगर व अन्य सील केलेल्या क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा अशी मागणीही या जमावातून करण्यात आली.इंदिरानगर व सील केलेल्या परिसरात बहुतांश गोरगरिबांची घरे आहे. हातावर आणून पानावर खाणे अशी त्यांची अवस्था आहे. मात्र दोन आठवड्यांपासून कोरोनामुळे एरिया सील केल्याने सर्व लोक घरात आहे. त्यांच्या हाताला काम नाही, रोजगारच नाही तर घरात पैसा येणार कोठून, मोठ्या संख्येच्या कुटुंबाची उपजीविका चालवावी कशी अशी भीषण समस्या तेथील नागरिकांपुढे निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निधीतून सर्वतोपरी मदत करून सील केलेल्या एरियातील रहिवाशांची लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी, अशी एकमुखी मागणी जमावातून करण्यात आली.जमाव रस्त्यावर आल्याचे कळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली. जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या जातील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. यानंतर पोलिसांनी काही वेळातच इंदिरानगर भागात दूध व ब्रेडच्या ८०० पॅकेटस्चे घरोघरी वाटप केले. त्यामुळे काही प्रमाणात जमाव शांत झाला. परंतु जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निधीतून जीवनावश्यक वस्तूचे घरोघरी वाटप तत्काळ सुरू न केल्यास पुन्हा इंदिरानगर प्रकरणाची पुनरावृत्ती होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोकाही वर्तविला जात आहे.जीवाची पर्वा न करता पोलीस २४ तास तैनातकोरोनाचा उद्रेक असलेल्या भोसा रोड, इंदिरानगर, पवारपुरा परिसरात सामान्य माणूस संसर्गाच्या भीतीने तेथे जायलाही धजावत नाही. अशा स्थितीत पोलिसांना मात्र २४ तास त्याच भागात काढावे लागतात. तेथेच चहा, नास्ता, जेवण, पाणी घ्यावे लागते. पोलीस एकीकडे जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित परिसरात अखंड सेवा देत असताना प्रशासनातील अन्य विभागाचे अधिकारी मात्र या भागात फिरकत नसल्यानेच मंगळवारी इंदिरानगरातील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. आम्ही आमच्या अडचणी कुणाला सांगाव्या, कुणाला जाब विचारावा व कुणाला जबाबदार धरावे असा सवाल त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांपुढे उपस्थित केला.संयुक्त कमिटी हवीयवतमाळातील सील केलेल्या एरियासाठी महसूल, नगरपरिषद, आरोग्य, पोलीस, नगरसेवक यांची संयुक्त देखरेख कमिटी बनविली जावी, कुठे किती व काय वाटप झाले यावर त्यांनी नजर ठेवावी, त्यांनी जीवनावश्यक वस्तू वाटपाचे समन्वयक व्हावे अशी मागणी जमावातून करण्यात आली.इंदिरानगरात महिला-पुरुषांचा प्रशासनाविरुद्ध रोष दिसून आला. आपत्ती व्यवस्थापनातून जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळत नाही, अधिकारी फिरकत नाही ही या जमावाची खंत होती. त्यांचा रोष कमी करण्यासाठी आम्ही लगेच दूध, किराणा साहित्याच्या किट पोहोचविल्या. रमजान महिना असल्याने प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे गरजेचे आहे. मदतीअभावी नागरिकांत रोष वाढून उद्रेकाची भीती आहे.- जावेद अन्सारी, नगरसेवक इंदिरानगर परिसर.
इंदिरानगरातील नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 5:00 AM
महसूल, नगरपरिषद, आरोग्य विभाग व अन्य प्रशासनातील अधिकारी या भागात फिरकत नाहीत, शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही, केवळ दानदाते व सामाजिक संस्थांच्या मदतीवरच वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्वत्र जेवण-धान्य पोहोचत नाही, पर्यायाने आमची उपासमार होत आहे, असा सरसकट सूर या जमावाने व्यक्त केला. एरिया सील असल्याने घराबाहेर निघू दिले जात नाही,
ठळक मुद्देतणावाची स्थिती : घरातील अन्न धान्य संपले, किराणा मिळत नाही, सांगा जगावे कसे ?