देवेंद्र फडणवीस : पुसद येथे जाहीर सभा पुसद : केंद्र आणि राज्य शासन जनतेच्या हिताच्या योजना राबवित असून शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व कष्टकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे आहे. येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व गोरगरिबांना हक्काचे घरे देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेला आमदार राजेंद्र नजरधने, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, पोहरादेवीचे संत रामराव महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात २०१४ मध्ये भाजपा-सेना युतीची सत्ता आहे. त्यावेळी राज्याची तिजोरी रकामी होती. जनतेच्या हिताच्या असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजना राज्य शासन राबवित आहे. केंद्र शासन घरकूल योजना राबवून २०२२ पर्यंत गरिबांना मोफत घरे देणार आहे. मात्र राज्य शासन येत्या २०१९ पर्यंतच घरकुलाचा प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाच वर्षात तब्बल २० हजार गावे दुष्काळमुक्त करून साडेसहा लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी भाजपा नेते अॅड. नीलय नाईक यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नंतर समाजाचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असून भाजपावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी शेंबाळपिंपरी येथील शिवसैनिक, वरुड येथील आरपीआय कार्यकर्त्यांनी भाजपात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रचार सभेला पुसद तालुक्यातील भाजपाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद जिल्हेवार यांनी तर आभार निखील चिद्दरवार यांनी मानले. (प्रतिनिधी)
सर्व गोरगरिबांना दोन वर्षात हक्काची घरे
By admin | Published: February 11, 2017 12:11 AM