यवतमाळ : फसवणुकीसाठी नवनवीन शक्कल ठगांकडून लढविली जाते. आता ते व्हॉट्सॲप नंबरला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, हे केबीसीकडूनच खेळले जात आहे, अशी बतावणी करून फसवणूक करीत आहेत. आतापर्यंत अनेकांना असे व्हॉट्सॲप कॉल आले आहेत. लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी काही शुल्क कराच्या स्वरूपात भरण्यास सांगून गंडा घातला जातो.
जिल्ह्यातील अनेकांना सध्या असे लॉटरी लागल्याचे कॉल येत आहेत. त्यातील काही जणांनी सायबर सेलकडे याची माहिती दिली. लॉटरीचे तिकीट जिंकल्याचे फोटो तसेच लॉटरी नंबरसुद्धा व्हॉट्सॲपवर पाठविले जातात. त्यामध्ये केबीसी हेड ऑफिस नंबर याशिवाय विविध वाहिन्या व संपर्कासाठी क्रमांकसुद्धा दिला जातो. महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती?’ या टीव्ही शोचा हवाला देऊन ठगांकडून जाळे टाकले जाते. तीन देशांसाठी ही लॉटरी काढण्यात आली आहे. त्यामध्ये लकी नंबर म्हणून तुमचा व्हॉट्सॲप क्रमांक निवडला गेलाय, असे सांगण्यात येते.
२५ लाखांची रक्कम मिळविण्यासाठी मुंबईतील स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक दिला जातो. त्याच्याशी व्हॉट्सॲप कॉलवर बोलून बक्षिसाची रक्कम मिळवून घ्या, असे सांगितले जाते. ही प्रक्रिया ठरावीक वेळेतच पूर्ण करावी लागणार आहे, असेही सांगण्यात येते. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला खातरजमा करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही, अशा पद्धतीने जाळे टाकले जाते.
पांढरकवडा शहरातील आंबेडकर वॉर्डमध्ये राहणाऱ्या जयश्री दीपक चौधरी यांना अशाच पद्धतीने व्हॉट्सॲप काॅल आला व २५ लाखांची रक्कम जिंकल्याची बतावणी केली. त्यांना व्हॉट्सॲप आलेला लॉटरीचा कोड मागविण्यात आला. लॉटरीची रक्कम मिळविण्याकरिता विविध टॅक्सचा भरणा करावा लागतो, असे सांगितले. सुरुवातीला जयश्री चौधरी यांनी याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा ठगाने त्यांच्या व्हॉट्सॲपवर २५ लाखांचे बक्षीस मिळालेल्या काही जणांचे व्हिडिओ सेंड केले. त्या व्हिडिओंत आपल्याला कशी २५ लाखांची रक्कम मिळाली याबद्दल विजेत्यांच्या प्रतिक्रिया होत्या. ते व्हिडिओ पाहून चौधरी यांनी विश्वास ठेवत ठगाने सांगितल्याप्रमाणे पाच ते सात हजार रुपये अशा रकमेत विविध खात्यांमध्ये पैसे टाकले. दिवसभरात तब्बल दीड लाख रुपये या पद्धतीने त्यांनी टाकले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
नागरिकांनी सतर्क राहावे
व्हॉट्सॲप नंबरला लॉटरी लागल्याचा कुठलाही प्रकार नाही. केवळ लुबाडण्यासाठी ही नवीन शक्कल ठगांनी शोधली आहे. अशा प्रलोभनाला नागरिकांनी बळी पडू नये. आपण लॉटरीचे तिकीट खरेदीच केले नाही तर लॉटरी लागणार कशी, हा साधा प्रश्न उपस्थित करावा. शक्यतोवर अशा कॉलवर बोलणेच टाळावे.
- अमोल पुरी
सहायक निरीक्षक सायबर सेल