पती-पत्नीस अटक : ढाणकीतील सहा लाखांच्या बनावट दागिन्यांचा वादढाणकी : मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले २१ तोळे सोन्याचे दागिने बनावट निघाले. सराफाने दागिने बदलवून देण्याचे मान्य केले. परंतु दागिनेही दिले नाही आणि पैसेही परत केले नाही. उलट सराफा व्यावसायिकाने ग्राहक महिलेला जबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, ही खळबळजनक घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे घडली. या प्रकरणी रविवारी सदर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सराफा व्यावसायिकाला पत्नीसह बिटरगाव पोलिसांनी अटक केली. खंडू यादव टिकणे (४५) आणि संगीता खंडू टिकणे (४०) रा. ढाणकी असे अटक केलेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. खंडू टिकणे यांचे ढाणकी येथे महालक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान आहे. सुरेखा तानाजी ब्रिदाळे रा. ढाणकी यांनी मुलीच्या लग्नासाठी महालक्ष्मी ज्वेलर्समधून २१ तोळे सोन्याचे दागिने बनविले. या दागिन्यांची किंमत सहा लाख १७ हजार ४०० रुपये आहे. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात दागिने काळे पडायला सुरुवात झाली. त्यामुळे सुरेखा दागिने बदलवून घेण्यासाठी महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये आली. त्यावेळी सराफा व्यावसायिकाने दागिने बदलून देण्याचे मान्य केले. तसेच सुरेखाकडून सोने खरेदीच्या पावत्या परत घेतल्या आणि सोन्याच्या दागिन्याच्या किंमतीचा धनादेश दिला. धनादेशाची रक्कम दिवाळी २०१५ पर्यंत देतो किंवा सोने देतो असे सांगितले. ही मुदत संपल्यानंतर सुरेखा सोन्याचे दागिने अथवा पैसे परत मागण्यासाठी सराफा व्यावसायिकाकडे गेली. अनेकदा मागणी करुनही दागिन्याची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू झाली. कधी प्रतिष्ठित नागरिकांना मध्यस्थी करावयास लावून टिकणे यांनी सोन्याचे दागिने किंवा पैसे परत करण्यास चालढकल केली.दरम्यान २४ एप्रिल २०१६ रोजी सुरेखा ब्रिदाळे पती तानाजी ब्रिदाळे यांना घेऊन महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये आल्या. या दोघांना दुकानात बसवून सराफा व्यावसायिक पैसे आणण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून निघून गेला. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तो परत आला. त्यावेळी तानाजी ब्रिदाळे बाहेर गेले होते. दरम्यान सराफा व्यावसायिकाने वाद घालून पत्नी संगीता टिकणे हिच्या मदतीने विषारी औषधाची बॉटेल सुरेखाच्या तोंडात ओतली. दुकानासमोरुन जाणाऱ्या एका महिलेने आरडाओरडा केल्याने भारत तुपेकर, विनायक तुपेकर, वसंता राठोड आदींनी धाव घेऊन सुरेखाची सुटका केली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. नांदेड येथे तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यानच्या काळातही टिकणे यांनी तिला धमक्या देणे सुरूच ठेवले. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून रविवारी बिटरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून खंडू यादव टिकणे, संगीता खंडू टिकणे यांच्याविरुद्ध बनावट सोन्याचे दागिने विकून फसवणूक करणे, संगनमताने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्हे दाखल केले. दरम्यान सोमवारी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली. अधिक तपास ठाणेदार सुरेश बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. (वार्ताहर) फसवणुकीचे अनेक प्रकार ढाणकी येथील महालक्ष्मी ज्वेलर्समधून अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याची प्रकरणे पुढे येत आहे. सराफा व्यवसायाच्या नावाखाली येथे अवैध सावकारीला ऊत आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
सराफाने ग्राहक महिलेस विष पाजले
By admin | Published: May 24, 2016 12:05 AM