दारव्हा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट आठवडाभरात कार्यान्वित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे हा प्लांट सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होणार असल्याने कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भात आमदार संजय राठोड यांनी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले. मंगळवारी यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे ही मागणी लावून धरली. त्याची तात्काळ दखल घेत हा निर्णय घेण्यात आला.
येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात ट्राॅमा केअर सेंटर आहे. त्यात सध्या डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे. ५० बेड रुग्णक्षमतेच्या या इमारतीत अनेक सुविधा आहेत; परंतु ६ केएल क्षमतेचा लिक्विड टँक, पाइपलाइन असूनही येथील ऑक्सिजन प्लांट बंद आहे. परिणामी सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. या सुविधेअभावी रुग्णांना यवतमाळ येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात.
सध्या तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णांची ही अडचण दूर होऊन याठिकाणीच उपचार घेता यावेत, याकरिता आमदार संजय राठोड प्रयत्नशील होते. त्यांनी याबाबत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करून तात्काळ हा प्लांट सुरू करण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी आठवडाभरात हा प्लांट सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लवकरच टँकद्वारे ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बॉक्स
लिक्विड टँकमुळे रुग्णांवर तालुक्यातच उपचार
दारव्हा, पांढरकवडा येथील डीसीएचसीमधील लिक्विड टँक कार्यान्वित करून रुग्णांना तालुक्यातच उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. आपल्या मागणीची पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली, तसेच जिल्ह्यातील आठ पीएचसीमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याचे नियोजन आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे आमदार संजय राठोड यांनी सांगितले.