स्मृतींना उजाळा : भिंतीवर रूबाब कायम ज्ञानेश्वर मुंदे । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : घड्याळ वेळ पाहण्याचे आणि नियोजनात मदत करण्याचे साधन. अविरत टिक टिक करीत काळाच्या बरोबरीने धावणे हाच त्याचा गुणधर्म. अशीच एक घड्याळ कलगावातील राऊत परिवाराच्या घराच्या भिंतीवर विराजमान आहे. चार पिढ्यांची साक्षीदार असलेली ही घड्याळ आजही गत काळातील स्मृतींना उजाळा देते. जुनं ते सोनं अशी म्हण प्रचलित आहे. जुन्या वस्तूची गुणवत्ता चांगली व टिकावू असते. अशीच एक घड्याळ दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील डॉ.रमेश राऊत यांच्या भिंतीवर टिक टिक करीत आहे. घरात प्रवेश करताच जुन्या दोलक असलेल्या घड्याळाचे दर्शन होते. डॉ.राऊत यांचे आजोबा बळीराम राऊत यांनी सुमारे ६० वर्षापूर्वी घड्याळ विकत घेतले. साईटीफीक क्लॉक कंपनीत गुजरातने सदर घड्याळ तयार केले आहे. लाकडाच्या सुबक कलाकृतीत घड्याळाचा दोलक सहा दशकांपासून टिक टिक करीत आहे. या घड्याळाला दहा ते बारा दिवसांनी चावी द्यावी लागते. आजही हे घड्याळ तंतोतंत वेळ दर्शविते. घड्याळीचा प्रत्येक ठोका राऊत परिवारातील गत स्मृतींना उजाळा देते. तुकडोजी महाराजांच्या भेटीची साक्ष राऊत परिवाराच्या नवीन वास्तू प्रवेश प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलगावात आले होते, असे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र राऊत यांनी सांगितले. राऊतांच्या वाड्यात तुकडोजी महाराजांची प्रतीक्षा प्रत्येकजण या घड्याळाकडे पाहून करीत होते. या सुवर्ण क्षणाचीसुद्धा ही घड्याळ साक्षीदार झाली. डिजीटल घड्याळांच्या विश्वात भिंतीवरील घड्याळ आजही रूबाबात वेळ दर्शविते. सध्या ही घड्याळ परिसरात कुतुहलाचा विषय आहे.
६० वर्षांपासून घड्याळाची अविरत टिक टिक
By admin | Published: May 24, 2017 12:24 AM