पुसद : येथील आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड सेंटर बंद आहे. ते पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
सध्या शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आयुर्वेदिक महाविद्यालयातील बंद असलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. गोरगरीब, गरजवंतांना वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आर्थिक पिळवणुकीचे प्रकार घडत आहेत.
आयुर्वेदिक महाविद्यालयातील कोविड सेंटर पूर्ववत झाल्यास शहरातील बहुतांश रुग्ण तालुकास्तरावर योग्य पद्धतीने उपचार घेऊ शकतील. त्यामुळे कोविड सेंटर पूर्ववत सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन नरेंद्र मोदी विकास मिशनचे प्रदेश सचिव अश्विन जयस्वाल यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुश्रृत चक्करवार, सनी देशमुख, राहुल खंदारे, पवन जयस्वाल आदी उपस्थित होते.