‘एसआयओ’चा आरोप : ‘नीट’ परीक्षा ऊर्दूतून नाही, सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार यवतमाळ : वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा आता ऊर्दूतून देता येणार नाही. त्यामुळे अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची दारे बंद झाली असून निटमधून ऊर्दूला हेतुपुरस्सर वगळण्यात आल्याचा आरोप स्टुडंटस् इस्लामीक आॅर्गनायझेशनने पत्रकार परिषदेतून केला. सीबीएससीतर्फे नीटच्या प्रवेशासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. मात्र ही परीक्षा देण्यासाठी ऊर्दू भाषा समाविष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या हजारो अल्पंख्यक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची दारे बंद होणार असल्याचा आरोप एसआयओचे कँपस सचिव तौसीफ जाफर खान यांनी पत्रकार परिषदेत केला. जवळपास २० हजार पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. त्यात वैद्यकीय क्षेत्राचाही समावेश आहे. ही परीक्षा १० भाषांमधून देता येणार आहे. मात्र त्यात ऊर्दूचा समावेश नाही. त्यामुळे एकट्या महाराष्ट्रातील ऊर्दू माध्यमाच्या १६८ कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांतील जवळपास १५ हजार विद्यार्थी संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले. अधिसूचना जारी करताना शासनाने इतर क्षुल्लक भाषांचा विचार केला. मात्र ऊर्दू भाषेसोबत सवतीचा व्यवहार केल्याचा आरोप तौसिफ खान यांनी केला. सीबीएससीने २०१३ मध्येही असेच धोरणे आखले होते. तथापि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निटसाठी ऊर्दूचा समावेश करण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत ऊर्दूचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे येत्या आठ दिवसांत यावर निर्णय न झाल्यास आयएसओतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. निट परीक्षेसाठी ऊर्दूचा समावेश नसल्याने अल्पसंख्यक विद्यार्थ्यांवरील हा अन्याय असून हा निर्णय पक्षपतीपणाचा असल्याचा आरोप खान यांनी केला. वैद्यकीय शिक्षणासाठी नीट परीक्षा हाच एकमेव मार्ग असून शासन तो मार्गच बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या धोरणाविरूद्ध व नीटची प्रश्नपत्रिका ऊर्दू भाषेत उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आयएसओ लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आयएसओचे जिल्हाध्यक्ष फवाद खान, सचिव रामीश काबील आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची दारे बंद
By admin | Published: February 09, 2017 12:15 AM