जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : दहा ग्रेडरची सेवा अधिग्रहित यवतमाळ : जिल्ह्यातील बाजार समितीच्या आवारात उघड्यावर असलेल्या तुरीचे मोजमाप जलद गतीने व्हावे यासाठी इतर धान्य खरेदी बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. यामुळे १३ शासकीय तूर केंद्रावर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या ६५ हजार क्ंिवटल तुरीची मोजणी तत्काळ होण्याची अपेक्षा आहे. तसेच तूर खरेदीत अडसर ठरणाऱ्या ग्रेडींगसाठी दहा ग्रेडरची सेवाही अधिग्रहित करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात १३ केंद्रावर शासकीय तूर खरेदी केली जात आहे. नाफेड सर्वाधिक भाव देत असल्याने शेतकऱ्यांची येथे प्रचंड गर्दी झाली. गत १७ दिवसांपासून शेतकऱ्यांचा या केंद्रांवर तूर विक्रीसाठी मुक्काम आहे. परंतु शासकीय नवनवीन आदेशामुळे तूर खरेदीत अडसर येत गेला. कधी बारदान्याचा अडसर तर कधी ग्रेडींगचा प्रश्न निर्माण झाला. जिल्ह्यातील १३ केंद्रावर ६५ हजार क्ंिवटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचचले आहे. शासकीय तूर खरेदी केंद्रात जोपर्यंत तुरीची पूर्ण मोजणी होत नाही तोपर्यंत इतर धान्य खरेदी बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मणराव राऊत यांनी दिले आहे. पुढील आठ दिवसात अथवा तूर संपेपर्यंत इतर कुठल्याही धान्याचा लिलाव न काढण्याचे पत्रच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस जिल्ह्यातील या बाजार समित्यांमध्ये धान्य खरेदी होणार नाही. तसेच शासकीय तूर खरेदी केंद्रावर ग्रेडरची आवश्यकता आहे. चार दिवस शोध घेऊनही ग्रेडर मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को.आॅप. फेडरेशन आणि एफसीआयच्या कर्मचाऱ्यांची ग्रेडर म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे दहा केंद्रावरील प्रश्नही निकाली निघाला आहे. (शहर वार्ताहर) तीन अधिकाऱ्यांचे पथक मर्यादित क्षमतेपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यासाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक जिल्ह्यात तयार करण्यात आली आहे. सदर पथक विविध केंद्रावरील कागदपत्रांची तपासणी करणार आहे.
बाजार समितीत तुरीसाठी इतर धान्य खरेदी बंद
By admin | Published: May 03, 2017 12:08 AM