वणी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील वांजरी गावालगत असलेल्या डोलोमाईट खाणीच्या खड्ड्यालगत तीन तरूणांचे कपडे, चपला, स्कूटी व मोबाईल आदी साहित्य आढळून आले. त्यामुळे हे तरूण खड्ड्यातील पाण्यात बुडाले तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हे तिनही तरूण वणीतील असल्याचे सांगितले जात आहे. अंधार असल्याने रविवारी शोधकार्य सुरू केले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
वणी तालुक्यातील वांजरी गावालगत डोलोमाईटच्या खाणी आहेत. शनिवारी सायंकाळी याच खाणीच्या एका पाणी भरलेल्या खड्ड्यालगत एक स्कूटी (एम.एच.२९-वाय.५३४२) आढळून आली. तसेच कपडे, चपला, मोबाईल आदी साहित्यही आढळून आले. याबाबत वणी पोलिसांना माहिती मिळताच, पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. याठिकाणी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. यासंदर्भात वणीचे ठाणेदार अजित जाधव यांना विचारणा केली असता, घटनेची माहिती मिळाल्याने पोलिस ताफा घटनास्थळी रवाना केला. घटनेची खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वणीतून बेपत्ता असलेले तिनही तरूण दर शनिवारी वांजरी गावालगतच्या खाणीतील खड्ड्याच्या पाण्यात पाेहण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली. शनिवारी सकाळी ११ वाजतापासून हे तीन तरूण वणीतून बेपत्ता असल्याची चर्चा आहे. सायंकाळी उशिरापर्यंत खड्ड्यालगत कपडे, स्कूटी, चपला, मोबाईल आदी साहित्य पडून होते. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. काही अनर्थ तर घडला नाही ना, या दिशेने वणी पोलिस तपास करित आहेत.