लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामगार कार्यालयाकडून नोंदणीपात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप करण्यात येतो. जिल्ह्यातील कामगारांना लोखंडी पेटीमध्ये अशा साहित्याचा वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुका असल्याने हे साहित्य वाटप थांबवावे, अशा सूचना आहेत. यानंतरही कंत्राटदाराने पेटी वाटप सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे पेटी वाटताना पैसे मागितल्या जात असल्याचा आरोप असून, यासाठी दलालही सक्रिय आहेत. कामगार कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. नोंदणी पात्र कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यात हेल्मेट, टार्च, डबा, बुट आणि कामकाज उपयुक्त साहित्याचा यामध्ये समावेश आहे. पाच हजार रुपयांची ही किट मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील कामगारांनी एकच गर्दी केली आहे. दोन वर्षांपूर्वी कामगारांना पेट्या वाटप करताना गैरप्रकार झाला होता. यामुळे कंत्राटदाराने हे केंद्रच शहराबाहेर हलविले आहे. आता येथेही दलालामार्फत पैसे मागितले जात असल्याचा आरोप मजूर करीत आहेत. मुळात ही पेटी योजनेमधून मोफत दिल्या जाते. मात्र मजुरांकडूनच पैसे उकळले जात आहे. पेटी मिळविण्यासाठी मजुरांचे जथ्थे विशेष वाहनाने शहराकडे येत आहेत. आचारसंहितेत पेटी वाटप करणे हा गुन्हा आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. यामुळे या काळात पेटी वाटप करताना आचारसंहितेचा भंग करू नका असे पत्र जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. मात्र यानंतरही मंगळवारी लोहारातील केंद्रावरून पेटीचे वाटप करण्यात आले. यामुळे आचारसंहितेचा आदेश पायदळी तुडविल्याचे चित्र आहे.
कामगार विभाग कारवाई करेल काय ?
- पेटी वाटपाची जबाबदारी ज्या कंत्राटदारांकडे आहे, त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. पैसे मागणीचाही आरोप आहे. यामुळे या प्रकरणाची सर्व जबाबदारी कामगार विभागावर आली आहे. या प्रकरणात कामगार विभाग आता काय कारवाई करतोयाकडे मजुरांचे लक्ष लागले आहे.
नगरपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांमुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात सुरक्षा व अत्यावश्यक संचाचे कामगारांमध्ये वाटप करताना आचारसंहितेच्या नियमांचा भंग होणार नाही, नियमांचे काटेकोर पालन होईल, या संदर्भातील निर्देश सुरक्षा किट वाटप करणाऱ्या कंत्राटदारांना दिले आहे. इतकेच नव्हे तर नियमाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, असेही सांगितले आहे. वाटप होत असल्यास ही बाब गंभीर आहे.
- चांगदेव काशिदजिल्हा कामगार अधिकारी