यवतमाळ : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा २६ वा स्मृती समारोह शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी आहे. यानिमित्ताने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे शनिवारी सकाळी प्रेरणास्थळ येथे व्याख्यान तसेच त्यांच्या उपस्थितीत प्रार्थना सभाही होणार आहे. स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता दिग्दर्शक मिलिंद ओक प्रस्तुत ‘ब्लॅक अँड व्हाइट’ हा स्क्रीन आणि स्टेजवरील परफॉर्मन्सचा अभिनव कोलाज असणारी संगीतमय आदरांजली दिली जाणार आहे.
बाबूजींना शास्त्रीय संगीताची आवड होती. शिवाय त्यांना सुश्राव्य संगीत तसेच सदाबहार गाणी आवडायची. शास्त्रीय गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, प्रख्यात सनई वादक भारतरत्न बिस्मिल्ला खान, गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर, पंडित जसराज, शास्त्रीय गायक तसेच संगीतकार नौशाद अली, शास्त्रीय गायिका किशोरी अमोणकर, गानसम्राज्ञी आशा भोसले, संगीतकार सी. रामचंद्र, गायिका शोभा मुदगल, जयदत्त आदींच्या संगीत तसेच गीतांचे ते चाहते होते. गझलमध्येही त्यांना विशेष रुची होती. त्यामुळेच दरवर्षी त्यांच्या आठवणीत स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला संगीतमय आदरांजली कार्यक्रम होतो.
त्याच श्रृंखलेत शुक्रवारी प्रेरणास्थळ येथे ‘ब्लॅक अँड व्हाइट’ या कार्यक्रमाद्वारे बाबूजींना संगीतमय आदरांजली वाहण्यात येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ असलेल्या १९४५ ते १९६८ या काळातील सिनेमाचा प्रवास यावेळी मंचावर अनुभवता येईल. उत्कृष्ट गाणी आणि संगीतामुळे त्यावेळचा चित्रपटसृष्टीचा पडदा अविस्मरणीय ठरला. के.एल. सैगल, बिमल रॉय, व्ही. शांताराम, गुरुदत्त आदी दिग्गज कलाकारांच्या सिनेमाचा हा प्रवास ‘ब्लॅक अँड व्हाइट’व्दारे रसिकांसमोर येणार आहे. यासोबतच स्टायलिश देवानंद, ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार, शो मॅन राज कपूर, सौंदर्यवती मधुबाला, मीना कुमारी आणि याहू फेम शम्मी कपूर यांच्या गीत-संगीतासह अभिनयाला हा कार्यक्रम उजाळा देणार आहे.
शनिवारी हनुमान आखाड्यात काटा कुस्त्यांची विराट दंगल
जिल्हा कुस्तीगीर संघाने यंदाही बाबूजींच्या स्मृती दिनानिमित्त येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात शनिवार, २५ नोव्हेंबर दुपारी १२ वाजेपासून कुस्त्यांची विराट दंगल आयोजित केली आहे. सात लाख रुपयांची जंगी लयलूट असलेल्या या दंगलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कार्याध्यक्ष प्रभाकर गटलेवार, सचिव अनिल पांडे आदींनी केले आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती
शनिवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत प्रेरणास्थळ येथे स्थानिक कलाकार संगीतमय आदरांजली वाहणार आहेत. यावेळी होणाऱ्या प्रार्थना सभेला प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
‘ब्लॅक अँड व्हाइट’ : दाेन रंगांच्या युगाची संगीतमय कथा
शुक्रवारी सायंकाळी सादर होणारा ‘ब्लॅक अँड व्हाइट’ हा कार्यक्रम दोन रंगांच्या युगाची कथा सांगणारा आहे. त्यामुळेच जुन्या पिढीसह तरुणाईलाही तो खिळवून ठेवतो. सादरीकरणाचे स्वरूप, स्टेज म्युझिकलची आठवण करून देणारे आहे. जिथे गायक पात्रांचा अभिनय करतात. संगीत, चित्र, मूव्ही क्लिप्स, किस्से आदींच्या माध्यमातून हा परफॉर्मन्स त्या काळातील आठवणींना उजाळा देतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर करणार असून नृत्य रिया देसाई, तर गायन चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, अभिलाषा चेल्लम आणि रसिका गानू यांचे आहे.