यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा २५वा स्मृती समारोह शुक्रवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी आहे. यानिमित्ताने आयोजित प्रार्थना सभेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी अभिजित पोहनकर यांची संगीतमय स्वरांजली होणार आहे.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. दि. २५ नोव्हेंबर रोजी त्यांचा २५वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने बाबूजींचे समाधी स्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता अभिजित पोहनकर यांच्या स्वरांजलीचा कार्यक्रम रंगणार आहे.
संगीत निर्माता, संयोजक, गायक, पियानो वादक अशा अनेक गोष्टींमुळे अभिजित पोहनकर यांनी संगीत क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ते ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजय पोहनकर यांचे सुपुत्र असून, त्यांनी जगप्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडून संगीत वाद्याचे धडे घेतलेले आहेत. अभिजित भारतातील एकमेव असे कलाकार आहेत, जे शास्त्रीय संगीत की-बोर्डवर वाजवितात. अभिजित हे बाॅलिवूड घराण्याचे असून, शास्त्रीय संगीतासह बाॅलिवूडच्या प्रसिद्ध गाण्याचे अनोखे फ्युजन सादर करतात. की-बोर्ड / व्होकलवर फ्युजन उस्ताद स्वत: अभिजित पोहनकर राहणार असून, शास्त्रीय गायनावर गंधार देशपांडे आणि बाॅलिवूड गायनावर सुश्री भव्या पंडित यांच्यासह ड्रम, गिटार आणि ताल वाजविणाऱ्या इतर कलाकारांची सोबत राहील.
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ९.३० यावेळेत प्रेरणास्थळ येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक कलाकार संगीतमय श्रद्धांजली अर्पण करतील. यानंतर ९.३० वाजता आयोजित कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर जिल्हा कुस्तिगीर संघाच्या वतीने दुपारी १२ वाजल्यापासून हनुमान आखाड्याच्या प्रांगणात शिवकालीन वाद्यांच्या गजरात भव्य इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल रंगणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची या स्मृती समारोहाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती राहणार आहे. दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या संगीतमय स्वरांजली कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहील.
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ९.३० यावेळेत स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लाेकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २५व्या स्मृती दिनानिमित्त प्रेरणास्थळ येथे प्रार्थना सभा होणार आहे. त्यानंतर बाबूजींचे जन्मशताब्दी वर्ष आणि २५वा स्मृतिदिन यानिमित्ताने सकाळी ९.३० वाजता प्रेरणास्थळ येथे आयोजित कार्यक्रमात छगन भुजबळ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शास्त्रीय संगीताचे फ्युजन आणि की-बोर्डवरील वादनाची मैफल
‘फ्युजन संगीतकार’ आणि की-बोर्डवरील शास्त्रीय संगीताचे वादक अशी अभिजित पोहनकर यांची ओळख आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील माधवराव भागवत विद्यालयातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर डहाणूकर महाविद्यालयातून त्यांनी विपणन, व्यवस्थापन विषयात पदवी घेतली. तबला, व्हायोलिन, संतूर, संवादिनी या वाद्याप्रमाणेच त्यांनी की-बोर्डवरील शास्त्रीय संगीत वादनाचे कार्यक्रम केले. शास्त्रीय संगीतातील मूळ चिजा, बंदिशी यांना कुठेही धक्का न लावता तसेच त्यांचा मूळ बाज न बदलता अभिजित यांनी शास्त्रीय संगीताचे फ्युजन आणि की-बोर्डवरील शास्त्रीय संगीताचे वादन हा प्रकार लोकप्रिय केला आहे.
२५व्या स्मृती समारोहात होणारे कार्यक्रम
*२४ नोव्हेंबर - संगीतमय स्वरांजली*
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : प्रेरणास्थळ
सादरकर्ते : अभिजित पोहनकर यांचे भारतीय शास्त्रीय संगीतासह बाॅलिवूडच्या प्रसिद्ध गाण्यांचे अनोखे फ्युजन.
*२५ नोव्हेंबर - प्रार्थना सभा व मार्गदर्शन*
वेळ : सकाळी ९ वाजता संगीतमय श्रद्धांजली. ९.३० वाजता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन.
स्थळ : प्रेरणास्थळ
*२५ नोव्हेंबर - कुस्त्यांची दंगल*
वेळ : दुपारी १२ वाजता
स्थळ : हनुमान आखाडा प्रांगण, यवतमाळ
जिल्हा कुस्तिगीर संघाच्या वतीने शिवकालीन वाद्यांच्या गजरात इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल.