रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेट्रोल, डिझेलसोबत गॅस सिलिंडरच्या किमती वाढत आहे. त्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर चार महिन्यात तब्बल ४९२ रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिकांनी व्यवसाय करताना महागाईच्या झळा किती सोसायच्या असा प्रश्न या व्यवसायातील नागरिक करीत आहेत. दररोज दर वाढविणे शक्य नाही. असे केले तर ग्राहक येणार नाहीत. यामुळे सर्वांनी एकत्रितरीत्या येऊन दरवाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. मजुरीचे दर वाढलेले आहे. मसाल्याचे दर वाढले, तेल महागले, गॅस महागला, डाळ महागली. मात्र, घरगुती गॅसवरची सबसिडी कमी झाली.
घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे घरगुती सिलिंडरचे दर ९८३ रुपयांवर पोहोचले आहे. हे दर वाढत नसले तरी पूर्वीच्या तुलनेत झालेली वाढ मोठी आहे. मात्र, यावर मिळणारी सबसिडी केवळ १९ रुपये शिल्लक राहिली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला.
व्यावसायिकांना फटका
सर्वच वस्तूंच्या किमती वाढत आहेत. पूर्वीच्या तुलनेत हे दर दीडपटीने वाढले आहे. तेल, तिखट, गॅस सिलिंडर आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दररोज वाढणाऱ्या किमतीने व्यावसायिक मंडळी हैराण आहे. नुकसान किती दिवस सहन करायचे, यामुळे दर वाढीसाठी विचार होत आहे.- अविनाश ओमनवार, हॉटेल व्यावसायिक
कोरोनाकाळात या व्यवसायाला मोठा फटका बसला. सर्व वातावरण पूर्ववत होत असताना महागाई मात्र वाढत आहे. अशा परिस्थितीत काही दिवस व्यावसायिकांनी महागाईची कळ सोसली. मात्र, आता दर आणखी वाढल्याने उत्पन्न २० टक्क्यांनी घटले आहे.- नीलेश कोठारी, हॉटेल व्यावसायिक
संघटना १५ टक्के वाढीच्या निर्णयाकडेसिलिंडरचे वाढलेले दर न परवडणारे आहेत. वस्तूंच्या किमती वाढत असताना मधात वाढ झाली तर ग्राहकांवर परिणाम होईल म्हणून प्रत्येकाने नुकसान सहन केले. आता दर १५ टक्क्यांनी वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यादृष्टीने संघटना विचार करीत आहे. सर्व वस्तू महागल्याने वाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.- रितेश तिलवानी, अध्यक्ष, रेस्टाॅरंट असोसिएशन