प्रशासनाचा निष्कर्ष : रोहयो कामांचा लोकप्रतिनिधींचा आग्रह फेटाळला यवतमाळ : जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांमधून विकास कामे सुरू आहेत. मात्र ही बहुतांश कामे जेसीबी, पोकलॅन्ड व अन्य यंत्रांद्वारे केली जात आहेत. तेथे मजुरांची आवश्यकता नाही. पर्यायाने मजुरांकडून कामाची मागणीही नाही. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची आता गरज नाही, असा निष्कर्ष जिल्हा परिषद प्रशासनाने काढला आहे. याच आधारावर युती सरकारमधील एका बड्या लोकप्रतिनिधीने रोहयोची कामे सुरू करण्याचा केलेला आग्रह प्रशासनाने फेटाळून लावला. १४ एप्रिल रोजी एक सार्वजनिक कार्यक्रम सुरू असताना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला बड्या लोकप्रतिनिधीचा फोन आला. त्यांनी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची सूचना केली. मात्र मजुरांकडून कुठेही कामांची मागणी शासकीय दप्तरी नोंदविली गेली नसल्याने रोहयोची कामे सुरू करण्याची सध्यातरी गरज नसल्याचे प्रशासनातील या अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर लोकप्रतिनिधीने किमान आपल्या मतदारसंघातील एका तालुक्यात तरी ही कामे सुरू करावी, असा आग्रह धरला. तेव्हा शासनाच्या बहुतांश योजनांमधील कामे यंत्राद्वारेच केली जात असून तेथे मजुरांची उपस्थिती नगण्यच असते. त्यामुळे रोहयोच्या कामांची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगितले. मात्र ते लोकप्रतिनिधी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी आपला रोहयोची कामे सुरू करण्याचा हेका कायम ठेवला. सभ्य भाषेत सदर लोकप्रतिनिधी ऐकत नसल्याचे पाहून अखेर प्रशासन संतापले. तुम्ही सरकारचे घटक असताना आमच्यावर चुकीच्या व गरज नसलेल्या कामांसाठी दबाव कसा काय आणता अशा शब्दात प्रशासनाने या लोकप्रतिनिधीला जाब विचारल्याचे सांगितले जाते. यावेळी प्रशासनाचा सूर संतप्त असल्याने ‘हॉट टॉक’ झाल्याचेही समजते. (जिल्हा प्रतिनिधी)
विकास कामांवर जेसीबी, पोकलॅन्डचा सर्रास वापर
By admin | Published: April 22, 2017 1:42 AM