वणी : तालुक्यातील निंबाळा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील देविदास गोहणे यांच्या जागेची ग्रामसचिवाने फेरफार करून खोडतोड केल्याची तक्रार त्यांनी तहसीलदारांकडे केली.निंबाळा ग्रामपंचायत हद्दीत गोहणे यांची १६०० चौरस फूट जागा आहे. त्यात ६०८ चौरस फूट जागेवर बांधकाम दाखविले आहे. ही जागा व बांधकाम १३ जानेवारी २००६ रोजी वणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बापूजी गोहणे यांनी त्यांचा मुलगा देविदास गोहणे याच्या नावाने विक्री करून दिली होती. त्याची ग्रामपंचायतीने नोंदही घेतली. ग्रामपंचायतीच्या दप्तरी नमुना आठ अमध्ये फेरफार व नोंद होऊन १६०० चौरस फूट जागा व त्यावरील ६०८ चौरस फुटांचे बांधकाम दाखविले आहे. मात्र सन २००७-०८ च्या कारकीर्दीत सचिव व तत्कालीन सरपंचानी खोडतोड करून नमुना आठ अमध्ये हेराफेरी करून फक्त ६०८ चौरस फूट जागा व बांधकामच दाखविल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे. १० आॅगस्ट २०१४ च्या नमुना आठ अमध्ये ६०८ चौरस फूट जागा व बांधकाम दाखविले आहे. नंतर १० सप्टेंबर २०१४ च्या नमुना आठ अमध्ये १६०४ चौरस फुटांपैकी ६०८ चौरस फुटांचे बांधकाम दाखविले आहे. ही विसंगती कशी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रॅकार्डमध्ये हेराफेरी झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या १७ नोव्हेंबरला ग्रामसभेत हा विषय ठेवण्यात आला होता. तेव्हा गोहणे यांनी सचिवांना निवेदन दिले असता, सचिवाने निवेदन स्विकारलेच नाही. त्यामुळे संबंधित सचिवाविरूद्ध अनुशासात्मक कारवाई करावी, २००७-०८ च्या कारकीर्दीमध्ये जी अनधिकृत फेरफार किवा खोडतोड केली, त्याची विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)
खोडतोड केल्याची तक्रार
By admin | Published: December 25, 2015 3:29 AM