यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्याने रॅगिंग झाल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ चौकशी समिती स्थापन केली असून, या समितीने बुधवारी रॅगिंग प्रकरणाशी संबंधित सर्वांचाच जबाब नोंदविला. निनावी ऑनलाईन तक्रार पोलिसांकडे पोहोचल्याने त्यांनीही यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला असलेल्या डॉ. अनमोल भामभानी या विद्यार्थ्याचा वरिष्ठ पाच डॉक्टरांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळे अनमोलला सेलूलायटीससारखा दुर्धर आजार जडला, अशी तक्रार त्याची आई जुही भामभानी यांनी मंगळवारी अधिष्ठातांकडे केली. त्यावरून चौकशी समिती गठित करण्यात आली. या समितीचे प्रमुख प्रोफेसर डॉ. सुरेंद्र गवार्ले, पॅथॉलॉजी विभागातील डॉ. विकास येडशीकर, शरीररचना शास्त्र विभागाचे डॉ. जीवतोडे, दंतरोग चिकित्सा विभागाच्या डॉ. बनसोडे यांनी बुधवारी रॅगिंग प्रकरणाशी निगडित सर्वांचा जबाब नोंदविणे सुरू केले. सर्जरी विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा इनकॅमेरा जबाब घेण्यात आला. शिवाय शस्त्रक्रियागृहात असणाऱ्या स्टाफ नर्स यांच्याकडूनही विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीबाबत माहिती घेण्यात आली. या प्रकरणात तथ्य आढळल्यास दोषी वरिष्ठ डॉक्टरांवर कारवाई होईल, असे निश्चित मानले जात आहे. रॅगिंग झाल्याची तक्रार होताच महाविद्यालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग होत असल्याची निनावी तक्रार १ जुलै २०२२ रोजी करण्यात आली होती. तेव्हा या तक्रारीची महाविद्यालय प्रशासनाने चौकशी केली. मात्र, कुणीही पुढे येऊन रॅगिंग होत असल्याची कबुली दिली नाही. त्यावेळी दोन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी कामाच्या ठिकाणी असभ्य वर्तणूक केली जात असल्याची तक्रार जबाबातून नोंदविली होती. त्यात संबंधिताचे नावही घेतले होते. यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांकडून द्वितीय वर्षाला असलेल्या विद्यार्थिनीची छेड काढली जात असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने सामोपचाराने व समुपदेशन करून हे प्रकरण निस्तरले.
त्यानंतर डॉ. अनमोल भामभानी यांच्या आईने मंगळवारी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला द्वितीय व तृतीय वर्षाला असलेल्या डॉक्टरांकडून छळ होत असल्याची तक्रार केली. आता या तक्रारीची चौकशी सुरू आहे. जुलै महिन्यात ऑनलाईन प्राप्त झालेल्या निनावी तक्रारीची यवतमाळ शहर पोलिसांनीही दखल घेतली असून, त्याची चौकशी सुरू आहे. बुधवारी पोलीस उपनिरीक्षक शशीकिरण नवकार यांनी महाविद्यालयात येऊन संबंधित डॉक्टरांना जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले. महाविद्यालयातील समितीची चौकशी पूर्ण होताच पोलिसांकडूनही या तक्रारीचा तपास केला जाणार आहे.
निष्पक्ष चौकशीसाठी हवी महाविद्यालयाबाहेरची समिती
रॅगिंग प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी इतर महाविद्यालयातील प्राध्यापकांची चौकशी समिती असावी, स्थानिक समितीकडून पारदर्शक चौकशी होण्याची शक्यता कमी आहे, असा संशयही व्यक्त केला जात आहे. पारदर्शक चौकशी झाल्यास धक्कादायक वास्तव पुढे येण्याची शक्यता मेडिकल विद्यार्थी वर्तुळातूनच वर्तविली जात आहे.