जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ग्रामसेवक आणि माजी सरपंचावर आरोपमहागाव : तालुक्यातील चिल्ली इजारा येथे विकासकामांच्या नावावर बोगस बिले काढून तब्बल १७ लाख रुपयांची अफरातफर तत्कालिन सरपंच आणि ग्रामसेवकाने केल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. रोहयोच्या कामातही गोंधळ दिसत असून, ग्रामपंचायतीचे सदस्य व त्यांचे नातेवाईकांना १०० दिवसांपेक्षा अधिक काम दिल्याचे मस्टरवर दिसून येते. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत आहे. महागाव तालुक्यातील तीन हजार लोकसंख्येचे चिल्ली इजारा हे गाव आहे. गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला. मात्र २०११ ते २०१५ पर्यंतच्या पाच वर्षात विकास निधी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. बोगस कामे दाखवून मोठ्या प्रमाणत बिले काढून जनतेची व शासनाची फसवणूक केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. विहीर दुरूस्ती व मोटार रिवार्इंडींगसाठी १२ लाख पाच हजार रुपयांची बिले काढण्यात आली आहे. तसेच गावात एकही नाली नसताना वारंवार नाली दुरूस्तीचे बिल काढण्यात आले. पाईपलाईन दुरूस्ती गवत काढणे यासाठी तीन लाख १० हजार रुपयांची बिले काढून अपात्र लोकांच्या नावावर ही बोगस बिले काढल्याचा आरोप आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड कामावर तर चक्क ग्रामपंचायत शिपाई बळीराम पवार आणि रोजगार सेवक संतोष जाधव यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर बिले काढली आहे. विशेष म्हणजे नियमानुसार रोजगार योजनेंतर्गत १०० दिवसांचे काम मिळणे गरजेचे आहे. परंतु काही निवडक लोकांनाच सतत २५० दिवस कामे दिली आहेत. विशेष म्हणजे गावात कोणतेही वृक्ष लावण्यात आले नाही, परंतु बील मात्र काढण्यात आले आहे. या सर्व प्रकाराला माजी सरपंच मोतीराम डुकरे व ग्रामपंचायतीचे सचिव प्रवीण कदम जबाबदार असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनाला अर्जुन राठोड यांच्यासह गावातील तब्बल ६० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रकरणी काय कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चिल्लीतील १७ लाखांच्या गैरव्यवहाराची तक्रार
By admin | Published: September 18, 2015 2:29 AM