५१ गुन्ह्यातील जप्त दारूची निर्गती
मारेगाव : मारेगाव पोलिसांनी वेगवेगळ्या ५१ ठिकाणी धाडी टाकत देशी तसेच विदेशी दारू पकडली होती. मागील वर्षात पकडलेली ही दारू गुरुवारी निर्गती करण्यात आली. वर्षभरात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार दाखल ५१ गुन्ह्यातील १० हजार रुपयांच्यावरील किमतीचा देशी व विदेशी दारूचा एकूण २ लाख ३ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक व दोन प्रतिष्ठित पंच यांच्या समक्ष या देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल निर्गती करण्यात आला. तसेच रिकाम्या झालेल्या दारूच्या बॉटलांचा लिलाव करून प्राप्त झालेली रक्कम राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यामार्फत शासनाकडे जमा करण्यात आले. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, तसेच पोलीस स्टेशनचे हेड मोहरर, पोलीस हवालदार रवींद्र गुप्ता व इतर सहकाऱ्यांनी पार पाडली.
भटक्या कुत्र्यावर उपचाराची मागणी
मारेगाव : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी असून ही कुत्री चर्म रोग व इतर आजाराने त्रस्त आहे. या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुरक्षित स्थळी सोडावे, अशी मागणी सचिन ढेंगळे, गोलू ढेंगळे, अभियंता कामटकर आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.
पीक कर्जाचे पुनर्गठन करा
मारेगाव : गेल्या हंगामात सोयाबीन व कापूस पिकाची नापिकी झाल्याने अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे या हंगामात बँकांची कर्ज शेतकऱ्यांना मिळू शकले नाही. पीक कर्जाचे पुनर्गठन करून सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तन्वी ठक मारेगाव तालुक्यातील प्रथम
मारेगाव : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत येथील विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने निकालाची परंपरा कायम राखली असून याही वर्षी या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ६८ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. त्यातील तब्बल ६० विद्यार्थी प्रावीण्यासह तर ८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. तन्वी कैलास ठक ही विद्यार्थिनी ९९.६० टक्के गुण घेऊन शाळेतून पहिली आली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे शाळेच्या अध्यक्षा संध्या राजेश पोटे, मुख्याध्यापिका ज्योत्स्ना लहुजी बोंडे यांनी कौतुक केले.