ग्रामपंचायतींमध्ये प्रतीक्षा यादी : मार्चअखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीयवतमाळ : रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीर खोदताना प्रत्यक्षातील अडचणींवर मात करून डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल एक हजार ६०१ इतक्या विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात दोन हजार विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. जिल्हा परिषदेने १०० टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. रोजगार हमी योजनेतून अत्यल्प भूधारक व अल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी यांना विहीर दिली जाते. या विहिरीचे अनुदान तीन लाख रुपये केल्याने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेने स्वतंत्र निर्णय घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर रोहयोच्या विहीर लाभार्थ्यांची कायम प्रतीक्षा यादी जाहीर करण्यास सांगितले. १२०४ ग्रामपंचायतींमध्ये या प्रमाणे यादी जाहीर झाली आहे. पहिल्या टप्प्यात किमान एका गावामध्ये १० विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत तीन हजार ४६३ विहिरी पूर्ण झाल्या आहे. एका आर्थिक वर्षात दोन हजार विहिरींचा टप्पा गाठण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यामध्ये उमरखेड तालुक्यात सर्वाधिक ३०९ विहिरी, यवतमाळ तालुक्यात २१२ विहिरी, महागावमध्ये १७५ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पाच हजार ४७८ विहिरी त्वरित पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला संपर्क अधिकारी नेमला आहे. यात महसुलातील उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यासोबतच जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, उपमुख्याधिकारी पंचायत, उपमुख्याधिकारी रोहयो, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती केली आहे. रोजगार हमी विभागाने विहीर खोदण्यासाठी ५०० फुटाचे अंतर ठेवण्याची अट दिली आहे, तर भूजल सर्वेक्षण विभागाच्या निकषाप्रमाणे १० चौरस मीटरमध्ये एक विहीर हा लक्षांक दिला आहे. या लक्षांकाची अडचण प्रत्यक्ष काम करताना होत आहे. मात्र त्यातूनही मार्ग काढून उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
नऊ महिन्यात दीड हजार विहिरी पूर्ण
By admin | Published: December 30, 2015 2:55 AM