रवींद्र चांदेकर।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे.निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने आपल्या सदस्यांची मोट बांधून सत्तेचा सोपान सर केला. यात अनपेक्षितपणे काँग्रेसला अध्यक्षपदाची लॉटरी लागली. सोबतच एक सभापतीपदही मिळाले. मात्र ही पदे प्राप्त करून घेताना काँग्रेसने देश आणि राज्य पातळीवर काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला सत्तेची दारे मोकळी करून दिली. या विचित्र युतीमुळे प्रथमच भाजपाला जिल्हा परिषदेत सत्तेची संधी मिळाली. जिल्हा परिषदेतील भाजपाचा हा चंचूप्रवेश आता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. पक्षाची ध्येयधोरणे खुंटीला टांगून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेतली. ही बाब नुकतेच यवतमाळात येऊन गेलेल्या प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही स्थानिक पातळीवरील तडजोड असल्याचे सांगून वेळ निभावून नेली.दरम्यान, राज्य पातळीवर आता यवतमाळातील जिल्हा परिषद सत्तेची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. राज्य पातळीवरील नेत्यांना यवतमाळातील ही युतीची भूमिका पक्षाला मारक ठरण्याची शक्यता वाटत आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत यवतमाळातील सत्ता डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसताच काँग्रेसच्या नेत्यांनी विचारमंथन सुरू केल्याचे सांगितले जाते. त्यातूनच येथील जिल्हा परिषदेची सत्ता सध्या डळमळीत झाली आहे. नेमके काय होईल, याबाबत कुणीच बोलायला तयार नाही. तथापि पक्षाने आदेश दिल्यास क्षणाचाही विलंब न करता राजीनामे देण्यास काँग्रेसचे पदाधिकारी तयार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सत्तेचे सिंहासन सध्या दोलायमान झाले आहे.विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांचा परिणामविधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी यवतमाळतील भाईगिरीचा उल्लेख केला. या उल्लेखाने जिल्हा परिषदेतील राजकारण ढवळून निघाले. विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांचा जिल्हा परिषदेतील सत्ताकारणावर परिणाम होत आहे. राज्यस्तरावर आरोप करायचे आणि जिल्हा परिषदेत मात्र सोबत काम करायचे, ही कुठली नितीमत्ता असा प्रश्न खुद्द काँग्रेसचेच काही सदस्य खासगीत उपस्थित करीत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिल्हा परिषदेतील राजकीय चित्र पालटण्याची चिन्हे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेतील संमिश्र सत्ता डळमळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:22 PM
जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे.
ठळक मुद्देस्थानिक काँग्रेस नेत्यांकडे लक्ष : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सूचक इशारा, भाजपाशी संगत ठरणार घातक