फोटो
पुसद : तालुका विधी समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश १ व्ही.बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात येथील न्यायालयात शनिवारी लोकअदालत घेण्यात आली. त्यात २०९ दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा निपटारा करून दोन कोटी ५३ लाखांची तडजोड राशी जमा करण्यात आली.
लोकअदालतीमध्ये वादपूर्व, दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, धनादेश अनादर, वाहन कायदा व किरकोळ फौजदारी अशी एकूण तीन हजार ९१५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. लोकन्यायालय चालविण्यासाठी सहा पॅनल्स गठित करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश १ व्ही.बी. कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश २ बी.वाय. फड, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर के.एम.एफ. खान, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस.एन. नाईक, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पी.आर. फुलारी, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व्ही.जी. वाघमोडे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर डी.बी. साठे यांनी कामकाज पाहिले.
या पॅनल्सवर वकील संघाचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. त्यात ॲड. दिलीप देशपांडे, प्रा.डॉ. बी.आर. देशमुख, प्रा.एस.एस. पाटील, प्रा. दिनकर गुल्हाने, ॲड. अंबिका जाधव आदींचा समावेश होता. लोकअदालतीच्या यशासाठी जिल्हा न्यायालय अधीक्षक विलास बंगाले, वरिष्ठ लिपिक रवी पेटकर, नीलेश भोयर, नीलेश खसाळे, प्रवीण कोयरे, एस.पी. ददगाळ, आरिफ शेख व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बॉक्स
प्रलंबित खटल्यांमुळे न्यायालयावर ताण
प्रलंबित खटल्यांमुळे न्यायालयावरील ताण वाढतो. न्यायदानास विलंब होतो. ताण कमी व्हावा, न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा लवकर व्हावा, यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालयाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या लोक न्यायालयात तडजोडीने खटले मागे घेता येतात. त्यामुळे पक्षकारांनी लोक न्यायालयाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका विधी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश १ व्ही.बी. कुलकर्णी यांनी केले.