पांढरकवडा : नागपूर येथील तडीपार युवक ओळखीचा असल्याने घरी आश्रय दिला असता, त्याने ज्यांनी आश्रय दिला त्यांच्याच मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. ही घटना राळेगाव तालुक्यातील कोची येथे घडली.सचिन पेशवे (२७), रा.नागपूर, असे आरोपीचे नाव आहे. सचिन हा नागपूर येथून तडीपार गुन्हेगार आहे. नागपूरच्या एका नातलगाच्या परिचयाचा लाभ घेत त्याने राळेगाव तालुक्यातील कोची-खैरी येथील एका कुटुंबाकडे आश्रय घेतला. मला आता सुधरायचे आहे, असे सांगितल्याने त्याला सदर कुटुंबाने आश्रयही दिला. दरम्यान त्याच कुटुंबातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीशी सचिनने जवळीक साधली. या दरम्यान गेल्या २ मे रोजी हे कुटुंबीय एका लग्न समारंभासाठी कोची येथून पांढरकवडा तालुक्यातील मीरा येथे गेले. तेथून त्यांची नववीतील मुलगी मामासोबत पांढरकवडा तालुक्यातीलच बोरगावला गेली. तेथे पोहोचून तेथूनच सचिनने तिला घरी नेतो म्हणून फूस लावून पळवून नेले. नंतर मामाने सदर मुलीच्या वडिलांना फोन करून सचिन मुलीला घेऊन गेल्याचे सांगितले. मुलीच्या वडिलांनी सचिनला फोन करून बोलाविले असता, त्याने मुलीला जोगीनकवाडा येथे मामाकडे ठेवल्याचे सांगितले. संबंधित कुटुंबीय सचिनला घेऊन जोगीनकवाड्याला पोहोचले, असता मुलगी तेथे आढळून आली नाही. सचिनला जाब विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत तेथून पळ काढला. त्यानंतर मुलीचा परिसरात शोध घेतला असता, ती कुठेही आढळून आली नाही. अखेर याप्रकरणी मुलीच्या आईने पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सचिनविरूद्ध भादंवि ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
तडीपार युवकाने कोचीच्या विद्यार्थिनीला पळविले
By admin | Published: May 22, 2016 2:21 AM