वणी तालुक्यातील वेळाबाई ग्रामपंचायतमध्ये संगणक ऑपरेटरपदी गावातीलच विलास कवडू ढेंगळे या युवकाची एजन्सीमार्फत नेमणूक करण्यात आली. संगणक ऑपरेटर हा एका खासगी कंपनीचा अभिकर्ता आहे. गावातील बहुतांश गरीब-श्रीमंत लोकांनी सदर कंपनीत गुंतवणूक केली आहे. मात्र, खातेदारांना बचतीचा आर्थिक मोबदला मिळाला नसल्याचा खासगी कंपनीच्या खातेदारांचा आरोप आहे. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीवरून सदर संगणक ऑपरेटर आणि खासगी कंपनीचे खातेदार यांच्यात वादावादी सुरू आहे. अशातच अज्ञात व्यक्तींनी ग्रामपंचायतीच्या संगणकीय कक्षाला कुलूप लावले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची ग्रामपंचायती संबंधित कामे ठप्प झाली आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर बाबीची दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत सरपंच प्रभुदास नगराळे यांना विचारणा केली असता, ग्रामपंचायतीचा संगणक ऑपरेटर आणि संबंधित ग्रामस्थांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या प्रकाराचा ग्रामपंचायतीशी काहीच संबंध नाही. ती त्यांची वैयक्तिक बाब आहे. सदर ऑपरेटरला कामावरून कमी केले नाही. मात्र, त्यांनी सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत कार्यालयात येऊन कामकाज करण्याची सूचना दिली आहे.
वेळाबाई ग्रामपंचायतीचा संगणक कक्ष कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:46 AM