नेर येथे काँग्रेस पक्षात दुफळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:58 PM2018-11-20T21:58:12+5:302018-11-20T21:58:43+5:30
शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहे. नामांकन अर्ज दाखल झाले आहे. शहरात राजकीय वातावरण तापत आहे. युती, आघाडी होत आहे. मात्र काही बाबी कार्यकर्त्यांच्या असंतोषालाही कारणीभूत ठरत आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली युती त्यातीलच एक प्रकार आहे. शहरात काँग्रेसची तेवढी ताकद राहिली नाही. म्हणूनच राष्ट्रवादीची सोबत घेतली, असे खुद्द कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी पालिकेत युती केली. माजी मंत्री माणिकराव ठाकरे, अशोक बोबडे, वसंत घुईखेडकर यांच्यात बैठक होऊन युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी काँग्रेसला या मुद्यावर ही युती घडली. बसपाचा उमेदवार म्हणून सर्वत्र जाहीर झालेल्या एका व्यक्तीलाही काँग्रेसने उमेदवारी दिली.
या सर्व घडामोडी होत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत होता. त्यांनी चक्क निषेध नोंदविला. विश्वासात न घेता युती करण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे. शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत वादही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. निषेध सभेला काँग्रेसचे पंजाबराव खोडके, सत्यविजय गुल्हाने, अनिल चव्हाण, मोहन खोडके, अन्सार उल्ला खान, सतीश तलवारे, बाबाराव पडोळे, अनिल चव्हाण, पीयूष अजमिरे, साजित खान, कुणाल मिसळे, विनोद पाटमासे, सुरेश बगमारे, राहुल मिसळे, नजीर खाँ राही, जफर खान आदी उपस्थित होते.
प्रामाणिकतेवर शंका
युतीमध्ये दोनही पक्षाला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. कुठल्या वॉर्डात कुणाला उमेदवारी द्यायची हे अद्याप निश्चित नाही.मात्र दोन्ही पक्ष एकमेकाला सुटलेल्या जागांचा प्रामाणिकपणे प्रचार करतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वीच एवढा असंतोष असेल तर पुढील चित्र कसे राहील याचा अंदाज येतो.