यवतमाळ : नेर नगरपरिषद क्षेत्रात सिमेंट रोड, डांबरी रोड सुस्थितीत असताना पालिकेने सुमारे दोन कोटी रुपयांच्या निविदा काढल्याचा खळबळजनक प्रकार काँग्रेसच्या नगरसेवकांनी उघडकीस आणला. अखेर हे प्रकरण नगरसेवकांनी सोमवारी २६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिका-यांच्या दरबारात आणले.
नेर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. सुनीता जयस्वाल नगराध्यक्ष तर त्यांचे पती पवन जयस्वाल नगर उपाध्यक्ष आहेत. विशेष असे या विधानसभा मतदारसंघाचे आमदारही शिवसेनेचे आहेत. याच आमदार संजय राठोड यांच्याकडे महसूल राज्यमंत्री पद तसेच जिल्ह्याचे सहपालकमंत्री पद आहे. त्याच पाठबळावर नेर नगरपरिषदेमध्ये शिवसेनेने मनमानी कारभार चालविल्याची ओरड विरोधी पक्षांकडून ऐकायला मिळते.
एकीकडे नेर शहरात प्रमुख रस्ते सुस्थितीत आहे. तर दुसरीकडे अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली आहे. या चाळणी झालेल्या रस्त्यांचे बांधकाम अपेक्षित असताना प्रत्यक्षात सुस्थितीत असलेल्या रस्त्यांच्या बांधकामासाठी नेर नगरपरिषदेने ५ आॅगस्टला निविदा काढल्या. सिमेंट व डांबरी रोड असताना कागदावर ते मुरुमाचे दाखवून अनुक्रमे ८१ लाख ३५ हजार ७०० व ९९ लाख ७४ हजार ४६० रुपयांच्या निविदा आहेत. आधीच ठिकठाक असलेल्या रस्त्यांवर केवळ कागदोपत्री बांधकाम खर्च दाखवून हा संपूर्ण सुमारे दोन कोटींचा निधी हडपण्याचा मनसुबा काँग्रेसचे नगरसेवक अॅड. सलीम उमर शाह, शहेबाज अहेमद अब्दूल कलाम, जबीउल्ला खॉ यांनी उघडकीस आणला. या संबंधी जिल्हा प्रशासन अधिका-याकडे तक्रार करण्यात आली आहे.
नेर नगरपरिषदेमध्ये अधिकृत कनिष्ठ अभियंता नियुक्त असताना अंदाजपत्रके बनविण्याची कामे यवतमाळातील खासगी एजंसीमार्फत केली जातात. यावरही सभागृहात मुद्दा उपस्थित केला गेला. आतापर्यंत या एजंंसीवर पालिकेच्या तिजोरीतून दोन कोटी रुपये खर्च झाल्याची तक्रार करण्यात आली. नेर नगरपरिषदेच्या सर्व सभांचे ठराव संचालकांच्या कार्यालयीन वेबसाईटवर टाकण्यात यावे, तसेच तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी नेर तालुका काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.