मोघे, पुरके, कासावार, खडसेंवर काँग्रेसचा विश्वास कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 06:00 AM2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:07+5:30
आर्णी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पाच टर्म पूर्ण केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गोंड समाजातील तरुणांनी एकत्र येऊन मुंबई-दिल्लीपर्यंत फिल्डींग लावली होती. मात्र त्यांना यश आले नाही. काँग्रेसकडून लढण्यासाठी वीज निर्मिती कंपनीचे उपमुख्य अभियंता मनोहर मसराम यांनी चक्क नोकरीचा राजीनामाही दिला होता. मात्र पक्षाने आपले अनुभवी नेते शिवाजीराव मोघे यांच्यावरच विश्वास कायम ठेवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस किमान ५० टक्के नवे चेहरे देणार असे सांगितले जात होते. परंतु जिल्ह्यात काँग्रेसने यवतमाळचा अपवाद वगळता अन्य मतदारसंघांमध्ये पुन्हा जुन्याच चेहऱ्यांवर विश्वास दाखविला आहे. या जुन्या चेहऱ्यांचे तिकीट कापण्यासाठी निघालेल्या पक्षातील विरोधकांना काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयाने मात्र मोठी चपराक बसली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जारी केली. काँग्रेसच्या इच्छुकांना या यादीची उत्सुकता व प्रतीक्षा लागली होती. या यादीने निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नव्या चेहºयांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला.
जिल्ह्यात काँग्रेसने आपल्या वाट्याच्या पाच पैकी चार मतदारसंघांमध्ये जुनेच चेहरे कायम ठेवले आहे. वणीमधून माजी आमदार वामनराव कासावार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वणी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा म्हणून प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे.
आर्णी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पाच टर्म पूर्ण केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गोंड समाजातील तरुणांनी एकत्र येऊन मुंबई-दिल्लीपर्यंत फिल्डींग लावली होती. मात्र त्यांना यश आले नाही. काँग्रेसकडून लढण्यासाठी वीज निर्मिती कंपनीचे उपमुख्य अभियंता मनोहर मसराम यांनी चक्क नोकरीचा राजीनामाही दिला होता. मात्र पक्षाने आपले अनुभवी नेते शिवाजीराव मोघे यांच्यावरच विश्वास कायम ठेवला.
राळेगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली आहे. आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्याशी पुरकेंचा सामना होणार आहे. पुरकेंच्या विरोधातही पक्षातील नवख्या चेहऱ्यांनी आपल्या दिल्लीतील उच्चपदस्थांशी असलेल्या संबंधाचा वापर करून मोर्चेबांधणी केली होती. मात्र ते त्यात फेल ठरल्याचे दिसते.
उमरखेड मतदारसंघातून काँग्रेसने माजी आमदार विजयराव खडसे यांना दुसऱ्यांदा रिंगणात उतरविले आहे. तेथूनही अनेक नव्या चेहऱ्यांनी खडसेंचा पत्ता कापण्याचा प्रयत्न केला. परंतु खडसेंचा गरीब व सोबर चेहरा त्यावर भारी पडला.
वणी, आर्णी, राळेगाव, उमरखेड या चारही विधानसभा मतदारसंघात जुन्याच लढती पहायला मिळणार आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात मात्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या रुपाने काँग्रेसने नवा चेहरा दिला आहे. या मतदारसंघात गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये सातत्याने नवा चेहरा देण्याचा प्रयोग काँग्रेसने केला. २०१४ मध्ये हा प्रयोग फसला असला तरी २००९ व त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यवतमाळात मांगुळकर यांची लढत ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्याशी होणार आहे.
खासदाराला वणी, आर्णीसाठी ‘नो रिस्पॉन्स’
लोकसभा निवडणुकीत आपले काम केले नाही असा ठपका ठेवत काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर यांनी कासावारांना आव्हान दिले होते. धानोरकर यांनी कासावारांऐवजी अनेक महिन्यांपासून कुण्यातरी राजकीय पक्षात एन्ट्री करण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या संजय देरकर यांचे नाव रेटले होते. त्यासाठी हा मतदारसंघ धानोरकर यांनी प्रतिष्ठेचाही केला होता. परंतु पक्षाने खासदाराचा प्रस्ताव नाकारत वामनराव कासावार यांनाच पुन्हा काँग्रेसची उमेदवारी दिली. या निर्णयाने आता देरकरांवर पुन्हा सोईचा प्लॅटफॉर्म शोधण्याची वेळ आली आहे. ते आता कोणता झेंडा हाती घेतात याकडे नजरा लागल्या आहेत.
काँग्रेसमधील मोघे विरोधकांना चपराक
अॅड. शिवाजीराव मोघेंच्या या उमेदवारीने त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातीलच काही ज्येष्ठ नेत्यांना हाताशी धरुन मुंबई-दिल्लीपर्यंत रण माजविणाऱ्यांना ज्युनिअर कार्यकर्त्यांना चांगलाच धोबीपछाड मिळाल्याचे मानले जाते. मोघेंचे तिकीट कापण्यासाठी जिल्हा काँग्रेसमधील दुसऱ्या गटाने जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांचा ‘रिमार्क’ही काहीच उपयोगी ठरला नाही.