काँग्रेसच सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:59 PM2018-03-23T23:59:52+5:302018-03-23T23:59:52+5:30
केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार घोषणा करण्यापलिकडे काहीच करीत नाही. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला थेट देशद्रोही ठरविले जाते.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार घोषणा करण्यापलिकडे काहीच करीत नाही. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला थेट देशद्रोही ठरविले जाते. सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच न्याय देऊ शकते, कार्यकर्त्यांनी भाजपाची जुलमी राजवट उलथविण्यासाठी कामाला लागला, असे आवाहन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘व्हीजन-२०१९’ अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन येथील आर्णी मार्गावरील वादाफळे पॅलेसमध्ये शुक्रवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. भाजपा सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार आणि बेरोजगार युवकांच्या समस्यात भर घातली. शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. आज बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कधी नव्हे इतक्या आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यवतमाळात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांचे मृत्यू तांडव घडले. शासनाने चौकशीचा देखावा केला. मात्र अहवालात कुणाचीच चूक नसल्याचे सांगितले. यावरून हे सरकार कोणासाठी काम करते, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.
काँग्रेसच सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकते, यासाठी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात पीक विमा, शेतमालाचे आधारभूत मूल्य, रोजगार निर्मिती यावर फोकस केला जाणार आहे. अडचणीत असलेल्या जनतेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वास देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिबिराच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुनगेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव, एनएसयुआयचे राज्याध्यक्ष आमीर शेख, आमदार हरिभाऊ राठोड, प्रकाश साबळे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, कीर्ती गांधी, विजय खडसे, विजयाताई धोटे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष माधुरी अराठे, संध्याताई सव्वालाखे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष सुनील भेले, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, चंद्रशेखर चौधरी, अनिल गायकवाड अजय किन्हकर आदी उपस्थित होते.