विशाल सोनटक्के
यवतमाळ : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीत सोमवारी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजपमध्ये चुरस दिसून आली. सर्वाधिक जागा कॉंग्रेसने पटकाविल्या असून दुसऱ्या क्रमांकावर भाजप राहिली आहे. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून तसेच फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
जिल्ह्यात ७२ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यापैकी दोन ग्रामपंचायती अविरोध झाल्या. ७० ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८२ टक्के मतदान झाले होते. सोमवारी संबंधित तहसील ठिकाणी मतमाेजणी पार पडली. कॉंग्रेसने सर्वाधिक ३४ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविल्याचा तर २३ ग्रामपंचायतीमध्ये भाजप विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पाच ग्रामपंचायती जिंकल्या असून शिवसेना आणि शिंदे गटाकडे प्रत्येकी एक तर सात ग्रामपंचायतीमध्ये इतर पक्ष तसेच स्थानिक आघाड्या जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे.