काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:48 PM2018-06-20T23:48:51+5:302018-06-20T23:48:51+5:30
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिरंगा चौकातच रोखण्यात आला. तर मोर्चेकऱ्यांचे रौद्ररुप पाहता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीही मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिरंगा चौकातच रोखण्यात आला. तर मोर्चेकऱ्यांचे रौद्ररुप पाहता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीही मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी विरोधी धोरण राबविण्यात आले. यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांची स्थिती बिकट झाली आहे. कृषी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. याच विरोधात काँग्रेस बुधवारी रस्त्यावर उतरली. स्थानिक शिवाजी चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील विविध मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार होता. या मोर्चाला प्रारंभी वीर वामनराव चौकातून दिशा बदलवावी लागली. दत्त चौकात हा मोर्चा धडकताच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच परिसरात असलेल्या पालकमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यानंतर हा मोर्चा तिरंगा चौकात पोहोचताच पोलिसांनी तेथे रोखला. या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. अनेकांनी सरकार विरोधात संताप नोंदविला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले.
या मोर्चात विधान परिषद उपसभापती आमदार माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष माधुरीताई अराठे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जीवन पाटील, डॉ. मो. नदीम, जिल्हा परिषद सभापती अरुणा खंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक चंदू चौधरी, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष नगरसेविका उषा दिवटे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.