राजेश निस्ताने - यवतमाळ वणी विधानसभेचे नेतृत्व करणार्या वामनराव कासावारांची ही चौथी टर्म असलीतरी कुणबी मतांचे विभाजन हाच त्यांच्या विजयाचा पाया राहिला आहे. कुणबी मतदारांची एकजूट ठेऊन यावेळी काँग्रेसचा खेळ बिघडविण्याची व्युहरचना कुणबी नेत्यांनी केली आहे. गेल्या वेळी कासावारांनी शिवसेनेच्या विश्वास नांदेकर यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या संजय देरकरांनी बंडखोरी करूनही वामनराव निवडून आले. कारण देरकर यांनी शिवसेनेकडे जाणार्या कुणबी मतांमध्ये मोठे भगदाड पाडले होते. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा कासावारच राहण्याची शक्यता आहे. दुसर्या फळीतील नेते मुलाचे नेतृत्व स्वीकारणार नाही, याची जाणीव झाल्यानेच त्यांनी पुत्रप्रेमाला आवर घातला असावा. मारेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र ठाकरे यांना काँग्रेसमधील दुसर्या फळीची पसंती राहू शकते. शिवसेनेकडून माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे नाव आघाडीवर आहे. वणी शिवसेनेत उपजिल्हा प्रमुखांचा एक गट सक्रिय आहे. या गटाकडून मात्र वेगळेच नाव रेटले जात आहे. राष्ट्रवादीतील नाराज नेते संजय देरकर यांचेही तळ्यात की मळ्यात सुरू आहे. ‘मातोश्री’वरून काही ‘आदेश’ येतो काय, यावर त्यांची पुढील ‘बांधणी’ अवलंबून आहे. तर मुळ शिवसेनेतील कुणालाही उमेदवारी द्या, पण नव्याने पक्षात आलेल्यांना संधी नको, अशी सामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे. सेनेतील दुसरा गट मात्र नवख्याला पाठबळ देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वामनराव चटप यांना खुला पाठिंबा देणारे देरकर विधानसभेत ‘आप’च्या आश्रयाला जाण्याची शक्यता आहे. मनसेकडून नेहमीप्रमाणे राजू उंबरकर यांचे नाव चर्चेत आहे. दोन कुणबी नेत्यांचे भांडण आणि काँग्रेसचा लाभ अशी वामनराव कासावारांची खेळी राहिली आहे. त्या बळावरच ते चौथ्यांदा निवडून आले. देरकर-नांदेकर भांडत रहावे आणि आपण पुन्हा निवडून यावे, अशीच काँग्रेसची रणनिती आहे. त्यासाठी यावेळीही पडद्यामागून भक्कम ताकद दिली जाईल. ९0 हजारांपेक्षा अधिक कुणबी मतदार येथे आहेत. त्यांच्यात फूट पाडून आपली पोळी शेकण्याची काँग्रेसची खेळी मतदारांपासून लपून राहिलेली नाही. यावेळी या खेळीला बळी पडायचे नाही, एकजूट होऊन समाजाचे नेतृत्व विधानसभेत पाठवायचे, असा निर्धार कुणबी नेत्यांनी केला आहे. हा निर्धार काँग्रेससाठी मात्र धोक्याची घंटा ठरला आहे.
कुणबी मतविभाजनावर काँग्रेसची मदार
By admin | Published: June 09, 2014 11:50 PM