काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधासाठी सत्ताधाऱ्यांचा ‘खविसं’कडे कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:07 PM2019-01-29T22:07:34+5:302019-01-29T22:08:28+5:30
दोन वर्षांपासून खरेदी विक्री संघाने खरेदी केलेल्या तूर, मूग, सोयाबीन आणि हरभऱ्याचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. खरेदी विक्री संघ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून तूर खरदीकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांना वेठीस धरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन वर्षांपासून खरेदी विक्री संघाने खरेदी केलेल्या तूर, मूग, सोयाबीन आणि हरभऱ्यांचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. खरेदी विक्री संघ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून तूर खरदीकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांना वेठीस धरले. याविरोधात जिल्ह्यातील खविसंच्या प्रतिनिधींनी मंगळवारी यवतमाळात धरणे आंदोलन केले. नंतर पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
२०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये सोयाबीन, चणा, तूर खरेदीसाठी खविसंचा पाच कोटीचा खर्च झाला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात खविसं राहिल्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप खरेदी विक्री संघाने केला आहे.
पत्रकार परिषदेला कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, यवतमाळ बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, पणनचे संचालक सुरेश चिंचोळकर, राजेश मॅडमवार, मिलिंद इंगोले, पंडीत बुटले, देविदास राठोड, संजय दुद्दलवार, धनंजय डुबेवार, अशोक सूर, चक्रधर तिर्थगिरीकर, पांडुरंग रोगे, दिगंबर पाचकोर, संजय इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
आॅनलाईन नोंदणीला नकार
बुधवारपासून तूर खरेदीची आॅनलाईन नोंदणी होणार आहे. खरेदी विक्री संघाने ही नोंदणी करण्यास नकार दिला आहे. हे काम मार्केटींग फेडरेशन अथवा व्हीसीएमएसकडे देण्यात यावी, असे मत पत्रकार परिषदेत मांडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तूर खरेदीचा पेच निर्माण झाला आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. शासनाने चुकारे दिल्याखरीज खरेदी होणार नसल्याची भूमिका यावेळी खविसंच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.