यवतमाळ : सोमवारी काँग्रेस पक्षाचा १३१ वा स्थापना दिवस देशभर साजरा झाला. यवतमाळ जिल्हा मुख्यालय मात्र याला अपवाद ठरले. सोमवारी दिवसभर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय कुलूप बंद होते. त्यामुळे स्थापना दिनी येथे कोणताही मोठा कार्यक्रम झाला नाही. या स्थापनादिनाबाबत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही अनभिज्ञता दिसून आली. काँग्रेसचा स्थापना दिवस सर्वत्र २८ डिसेंबरला साजरा करण्यात आला. सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व अन्य वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचा ध्वज फडकविला. या निमित्त पक्षातर्फे भरगच्च कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयातही ध्वजारोहण व कार्यक्रम पार पडले. मात्र यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात सोमवारी वर्धापन दिनी शुकशुकाट होता. कार्यालय कुलूप बंद होते. तेथे ध्वजारोहण किंवा अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते. कार्यक्रमच नसल्याने जिल्हाध्यक्ष किंवा पक्षाचे अन्य कोणतेही वरिष्ठ नेते कार्यालयाकडे फिरकले नाही. किंवा पक्षाचा वर्धापन दिन असल्याचे स्मरणही कुणाला झाले नाही. नेतेच अनभिज्ञ असल्याने काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाचे स्मरण असण्याचा कदाचित प्रश्न उपस्थित होत नसावा. मंगळवारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाने पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला नसल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसमध्ये सारवासारव केली गेली. तालुकास्तरावर हा वर्धापन दिन झाल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात त्याबाबत कुठूनही वृत्त आलेले नाही. यवतमाळ जिल्हा मुख्यालयी नेमका कुठे वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला हे सांगण्यास कुणीही पुढे आलेले नाही. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना चक्क पक्षाच्या वर्धापन दिनाचा विसर पडावा यावरून काँग्रेसवर किती मोठ्या प्रमाणात मरगळ आली, हे स्पष्ट होते. (जिल्हा प्रतिनिधी)
स्थापना दिनी काँग्रेस कार्यालय कुलूप बंद
By admin | Published: December 30, 2015 2:56 AM